नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलामध्ये ‘नव युगातील उद्योगासाठी व्यवस्थापकीय संकल्पनाचे पुनर्विलोकन’ या विषयावर दि. २७ व २८ जानेवारी रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अझादि का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंदसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न होणार आहे.
जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित, प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग या परिषदेस लाभणार आहे. यामध्ये कॅनडा येथील प्रो. आचार्यलू, अमेरिका येथील एम.आय. जॉब्स, जर्मनी येथील व्ही. गुब्बी, यूएसए येथील डी. पॉल, कॅलिफोर्निया येथील श्री. कुलकर्णी, बोटसवाना येथील दिलीप झंवर, साऊथ आफ्रिका येथील श्री. प्रवीणकुमार केंद्रेकर, गुजरात येथील संदीप भट्ट, औरंगाबाद येथील उद्योजक श्री. मुकुंद भोगले, जालना येथील श्री. सुनील रायथत्ता, तेलंगणा येथील डॉ. नागेश्वरराव, संभाजीनगर येथील अधिष्ठता डॉ. वाल्मिक सरोदे, पुणे येथील अधिष्ठता डॉ. पराग काळकर, प्रा. डॉ. मंडलिक आणि प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या परिषदेमध्ये देशातील व प्रदेशातील २०० संशोधक सहभागी होणार असून ते आपले शोधनिबंध या परिषदेत सादर करणार आहेत. या परिषदेचा लाभ अधिकाधिक संशोधक, विद्यार्थी, शिक्षक व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन परिषदेचे आयोजक तथा संकुलाच्या संचालिका डॉ. माधुरी देशपांडे व प्रा. डॉ. डी.एम. खंदारे यांनी केले आहे.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी संकुलातील प्रा. डॉ. वाणी लातूरकर, डॉ. विजय उत्तरवार, डॉ. बालाजी मुधोळकर, डॉ. निशिकांत धांडे, डॉ. रणजीत तेहरा, डॉ. गजानन मुधोळकर, डॉ. अमरप्रीतकौर रंधावा, डॉ. भगवान केंद्रेकर, डॉ. विजय घाटे, मृणाल आगलावे, जयराम हंबर्डे, सिमरनकौर खालसा, सुभास गाभणे, विठ्ठल होळकर, अनिता डुलगज यांच्यासह विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.