नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील प्रसिध्द व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या करतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे दोन हल्लेखोर तपास यंत्रणांना छकवत होते. दिल्लीच्या विशेष पथकाने त्या दोघांपैकी एका अल्पवयीन बालकाला काही महिन्यांपुर्वी पकडले होते. दुसरा मुख्य गुन्हेगार राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने नेपाळ देशाच्या सिमेवरून पकडला. आता पडलेल्या दोघांकडून अतिरेकी कार्यवाह्यांची माहिती काढण्यांची जबाबदारी तपास यंत्रणावर आली आहे.
5 एप्रिल 2022 रोजी बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर दोन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. घडलेला प्रकार भयंकरच होता. त्यात राजकारण आले. त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळी वळणे लागली. काही लोकांना त्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा वाढवून मिळाली. असे अनेक प्रकार घडत असतांना तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक निसार तांबोळी यांनी या बाबत एक विशेष तपास पथकाची स्थापना केली. त्यात जवळपास शतकाच्या आकड्याऐवढे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार रात्रंदिवस राबत होते. त्यात नांदेड पोलीसांनी एकूण 15 जणांना अटक केली. पुढे याप्रकरणात मकोका कायदा जोडला गेला आणि तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना देण्यात आली.सध्या या प्रकरणात नांदेड जिल्हा पोलीस दलाने 13 जणांविरुध्द मकोका कायद्यानुसार दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. दोन जणांचा मकोका याप्रकरणातून वगळला गेला. पण त्यांच्यावर खूनाचा आरोप आहेच.
संजय बियाणी यांचा खून अतिरेकी हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा याच्या सांगण्यावरून झाला होता अशी माहिती समोर आली होती. काही महिन्यांपुर्वी गोळीबार करणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केले होते.तो सध्या मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलीसांच्या ताब्यात आहे. संजय बियाणी यांचा दुसरा मारेकरी दिपक सुरेश रांगा यास बुधवारी तपास यंत्रणेने नेपाळ देशाच्या सिमेजवळ पकडले.या दिपक रांगाने देशभरात अनेक राज्यांमध्ये असे 25 गुन्हे केले आहेत. त्यात पंजाब पोलीसांच्या गुप्तहेर विभागाच्या कार्यालयावर रॉकेट हल्ला सुध्दा दिपक रांगाने केला होता.
काही महिन्यांपुर्वी हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा हा पाकिस्तानमध्ये मरण पावला अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यानंतर एबीपी सांझाचे संपादक जसविंदर पटीयाल यांनी हरविंदरसिंघ रिंदाची थेट मुलाखत प्रसिध्द केली होती. तेंव्हापासून पुन्हा एकदा नांदेड पोलीस अलर्ट झाले. कारण अनेक व्यवसायीकांनी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाला खंडण्या दिलेल्या आहेत. त्याचे अनेक लोक नांदेड जिल्ह्यात काम करतात. आता नांदेड जिल्हा पोलीस त्यांच्यावर पुन्हा एकदा बारकाईने लक्ष ठेवून आहे.
संजय बियाणी हत्याकांडातील पकडलेले दोन्ही हल्लेखोर अद्याप नांदेड पोलीसांच्या ताब्यात आलेले नाहीत. हे दोन्ही आरोपी पंजाब येथील तपास संपल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात दिले जातील आणि त्यानंतर संजय बियाणी यांच्या हत्येचा कट रचतांना काय-काय घडले होते जे पोलीसांना माहित झाले नाही ते गुपीत या हल्लेखोरांच्या अटकेनंतर समोर येणार आहे.
संजय बियाणी हत्याकांडातील दुसरा सज्ञान मारेकरी एनआयएने पकडला