नांदेड,(प्रतिनिधी)- शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी महिपाल या गावात ऑनर किलिंग प्रकार घडला आहे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीला तिच्या घरच्या मंडळींनीच खून करून तिचे प्रेत जाळले आहे. आज दिनांक 27 जानेवारी रोजी लिंबगाव पोलिसांनी या प्रकरणी युवतीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या तिच्या वडिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 22 जानेवारी रोजी पिंपरी महिपाल या गावात घडलेला प्रकार भयंकर आहे. त्या दिवशी रात्री 10 ते 11 वाजे दरम्यान एका 22 वर्षीय युवतीला तिचे वडील आणि इतर नातलगांनी मिळून मारून टाकले होते. याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी याबाबतची माहिती जमवली. त्यातून अत्यंत भयंकर प्रकार पुढे आला जनार्दन जोगदंड यांची मुलगी वय 22 ही नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस चे शिक्षण घेत होती. मागे गेलेल्या दिवाळीनंतर त्या युवतीचे लग्न ठरले. पण गावातील युवक अमोल बळीराम कदम याच्यासोबत असलेल्या प्रेम संबंधांमुळे झालेली सोयरीक मोडली गेली. तेव्हा युवतीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड (48) भाऊ कृष्णा जनार्दन जोगदंड (19) आणि इतर नातलग गिरधारी शेषेराव जोगदंड (30), गोविंद केशवराव जोगदंड (32) आणि केशव शिवाजी कदम (37) या सर्वांनी मिळून त्या युवतीला 22 जानेवारी रोजी रात्री आपल्याच घरात दस्तीने गळा आवळून खून केला. नंतर तिचे प्रेत खताच्या पोत्यात टाकून दुचाकी वर आपल्या शेतात नेऊन जाळून टाकले आणि 23 जानेवारी रोजी त्या युवतीची झालेली राख पोत्यातभरून ती पाण्यात वाहून टाकली.
पोलिसांच्या गुप्तहेरानीं मिळवलेली ही माहिती आणि त्यावर लिंबगाव पोलिसांनी केलेली पुढील कार्यवाही अत्यंत प्रशासनीय आहे. या घटनेची चौकशी करणारे पोलीस उपनिरीक्षक कोंडीबा बापूराव केसगीर यांनी लिंबगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खून करून, तिचे प्रेत जाळून, राख पाण्यात वाहून टाकणाऱ्या युवतीचे वडील भाऊ आणि इतर नातलग अश्या एकूण 5 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201,120 (ब) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास लिंबगावचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार हे करणार आहेत.
पोलिसांनी घडलेला प्रकार शोधून अत्यंत गुप्तपणे माहिती काढून त्यावरून दाखल केलेला हा गुन्हा आहे. याची प्रशंसा होणे आवश्यक आहे. आपल्या मुलीच्या प्रेम संबंधामुळे केलेली सोयरीक मोडली याचा राग म्हणजेच अखेर युवतीची हत्या म्हणजे ओनर किलिंगचाच प्रकार आहे असेच म्हणावे लागेल.संत मंडळी सांगतात दुष्कर्म करू नका ते लपत नसतात.असेच या प्रकरणात झाले आहे.5 दिवसापूर्वी केलेला खून पोलिसांनी सोधलाच आणि गुन्हा दाखल केला आहे.लिंबगाव पोलिसांनी मारेकरी 5 जणांना अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराव धरणे व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी माहिती मिळवून तिला प्रत्यक्षात कायद्याच्या प्रक्रियेत आणून ऑनर क्लिंग करणाऱ्या पाच जणांना गजाआड करणाऱ्या पोलीसांचे कौतुक केले आहे.