
नांदेड(प्रतिनिधी)-23 जानेवारीच्या मध्यरात्री एका 60 वर्षीय महिलेचा खून करून 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या 5 दरोडेखोरांना देगलूर पोलीसांनी आणि इतर पथकांनी मिळून पाचव्या दिवशीच गजाआड करून प्रशंसनिय कामगिरी केली आहे. याबद्दलची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज नांदेड येथे पत्रकारांना दिली.
श्रीपतराव रामजी पाटील (90) वर्ष यांचे घर लालबहादुर शास्त्री नगर देगलूर येथे आहे. ते मुळ राहणार येडूर ता.देगलूर येथील आहेत. या प्रकरणाचे तक्रारदार श्रीपतराव पाटील हे आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत अर्थात चंद्रकला श्रीपतराव पाटील (60) यांच्यासोबत राहतात. श्रीपतराव पाटील यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पत्नीपासून 5 मुले आहेत. तिसरी पत्नी चंद्रकलाबाई हिला मुलबाळ झाले नाही पण त्यांच्या पहिल्या नवऱ्यापासून मिळालेली भरपूर संपत्ती आहे.
दि.23 जानेवारी रोजी श्रीपतराव पाटील आणि चंद्रकलाबाई रात्री 9 वाजता आपल्या घराचे मुख्य गेट बंद करून कुलूप लावून घरातच होते. चंद्रकलाबाई यांना टी.व्ही. पाहता-पाहता झोप लागली. श्रीपतराव पाटील त्यांच्या अगोदरच झोपले होते. रात्री 11.30 वाजेच्यासुमारास आपल्या गालावर काही वजन आहे. हे लक्षात आल्याने श्रीपतरावांना जाग आली. तेंव्हा एक व्यक्ती त्यांच्या गालावर पाय ठेवून उभा होता. दुसऱ्याने त्यांचे पाय लुंगीने बांधून टाकले. चंद्रकलाबाईजवळ झटापटीचा आवाज येत होता. चंद्रकलाबाईला पाहिले असता त्यांच्या डोक्यावरही पाय ठेवलेला दिसला. आम्हाला मारु नका काय पाहिजे ते घेवून जा असे श्रीपत पाटील यांनी सांगितले. दरम्यान चंद्रकलाबाईच्या तोंडाला दरोडेखोरांनी रुमाल बांधलेला होता. चंद्रकलाबाई यांच्या गळ्यात असलेली 15 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व चांदीचे 70 तोळे वजनाचे वाळे असे चोरट्यांनी बळजबरीने काढून घेतले होते. दरोडेखोरांनी एकूण साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, किंमत 3 लाख 75 हजार रुपयांचे तसेच 70 तोळे वजनाचे चांदीचे वाळे ज्यांची किंमत 14 हजार रुपये आहे असा एकूण 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 397, 354 नुसार गुन्हा क्रमांक 39/2023 दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास देगलूरचे पोलीस निरिक्षक मोहन माछरे यांच्याकडे देण्यात आला होता.
या दरोडेखोरांना शोधतांना पोलीसांनी कर्नाटक राज्यापर्यंत एकूण 90 तासांचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले.देगलूर शहरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तीन जण एका बिअर बारमध्ये जात आहेत, ते रस्त्याने चालत आहेत, श्रीपतराव पाटील यांच्या घराच्या रस्त्यावर आहेत. तेथून परत येत असतांना त्यांच्या हातात थैली आहे, त्यांनी नंतर एक चार चाकी वाहन बोलावले आणि त्यात बसून ते तिघे दरोडेखोर पसार झाले असे अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये छायाचित्रण उपलब्ध आहेत.
देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार सुर्यकांत मुंडे, गुंडेराव कर्ले, पोलीस ठाणे मुखेड येथील पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरिक्षक भारत जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार, पोलीस ठाणे मरखेल येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे, पोलीस अंमलदार बारी आणि एंगाळे, पोलीस ठाणे मुक्रामाबाद येथील पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, कागणे, पोलीस अंमलदार मरगेवार आणि शिंदे तसेच सायबर पोलीस विभागातील पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, राजेश सिटीकर यांनी तांत्रीक मदत केली. सर्व प्रथम देगलूर येथील पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे, श्रीकांत मोरे आणि पोलीस अंमलदार सुनिल पत्रे यांनी त्या दरोडेखोरांना ओळखले.
अनेक पोलीस पथकांनी चार दिवस न थकता मेहनत घेतली आणि या दरोडेखोरांना शोधले. त्यांची नावे विठ्ठल व्यंकट बोईनवाड रा.वसुर ता.मुखेड, बालाजी पंढरी सोनकांबळे रा.मंग्याळ ता.मुखेड, गौतम दशरथ शिंदे रा.वसुर ता.मुखेड, शेषराव माधवराव बोईनवाड रा.वसुर ता.मुखेड आणि शहाजी श्रीराम मोरताळे रा.मोरतळवाडी ता.उदगीर जि.लातूर अशी आहेत.
या चोरट्यांचा उद्देश फक्त आणि फक्त दरोडा टाकण्याचा होता अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितली. आता पर्यंत माहित झालेल्या माहितीनुसार त्यातील एक दरोडेखोर लोकांच्या घरात माहिती घेतो, तो काही तरी बांधकामाचे काम करतो आणि त्या घरातील माहिती जमा करून आपल्या सहकारी दरोडेखोरांना सांगून दरोडे टाकतो अशी यांची पध्दत आहे. या दरोडेखोरांनी जिल्ह्यात अजूनही काही गुन्हे केले आहेत. त्याबद्दलची माहिती तपासात पुढे येईल.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
श्रीकृष्ण कोकाटे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, देगलूर येथील हा प्रकार उघडकीस आणला तेंव्हा असे लक्षात येते की, आपल्या घरात येणाऱ्या नवीन माणसासोबत आपल्या घरातील संपत्तीची चर्चा होणार नाही. तसेच त्या संपत्तीबाबत त्याला काही कळणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हाभरातील जतनतेला श्रीकृष्ण कोकाटे यांनी आवाहन केले आहे की, आपल्या घरी, प्रतिष्ठाणात, वसाहतीत, व्यापारी संकुलात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्याचे तोंड रस्त्यावर असू द्या जेणे करून अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर त्या सीसीटीव्ही फुटेजला तपासून गुन्हेगारांची माहिती जमवता येईल. हा गुन्हा उघडकीला आणण्यात सायबर विभागाची तांत्रिक मदत आणि सीसीटीव्ही सर्वात महत्वपुर्ण ठरले आहेत अशी माहिती श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.