नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेने बाराहाळी येथील शिक्षकाच्या घरात लूट करणाऱ्या चोरट्यांपैकी दोघांना पकडून त्यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाराहाळी गावातील एका शिक्षकाच्या घरात लूट करून चोरट्यांनी किमती ऐवज लांबवला होता. याबाबत मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 8/2023 दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मुक्रामाबाद येथे जबरी चोरी करणारे गुन्हेगार नांदेड मध्ये नमस्कार चौकात आहेत. आपल्याकडे आलेली माहिती त्यांनी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिली आणि त्यांच्या आदेशानुसार त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आपल्या पथकाला पाठवले. पोलीस पथकाने नमस्कार चौकातून शिवप्रसाद उर्फ सॅण्डी लक्ष्मण बोडके ,(20) राहणार बोरगाव ता. देगलूर जि. नांदेड हल्ली मुक्काम वसंतनगर नांदेड आणि सत्यम प्रकाश मेनकुदळे (23) राहणार वरवडा ता. नायगाव जि. नांदेड हल्ली मुक्काम विनायकनगर नांदेड या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून बाराहाळी गावातून लुटलेल्या ऐवजा पैकी 1 लाख 79 हजार 90 रुपयांचा ऐवज जप्त केला.
पकडलेल्या बोडके आणि मेनकुदळे या दोन्हींना तपासासाठी मुक्रामाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे, देगलूरचे पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, रणधीर राजबंशी, बालाजी यादगीरवाड, महेश बडगू, हेमंत बिचकेवार या पथकाने केलेल्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.