रेल्वे प्रश्नांसाठी मजविपच्यावतीने मुक आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील रेल्वे विषयक प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध तालुका कार्यालयांवर मुक आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्याचा सर्वांगीन विकास आणि अनुशेष भरुन काढण्यासाठी सतत अग्रही राहणार्‍या मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने आज संपुर्ण मराठवाडाभर रेल्वे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरांवर मुक आंदोलन करण्यात आले. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वात मुक आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांमार्फत रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे लाईन व डबल लाईनच्या कामांना तातडीने गती द्यावी, नांदेड डिव्हीजन मध्य रेल्वेशी जोडावे, परभणी ते मनमाड डबल लाईन लवकरात लवकर करावी, वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन मार्गाचे काम सुरु झाले आहे परंतु निधीचा तुटवडा दिसत आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाला राज्य व केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, नगर-बिड-परळी वैजनाथ मार्गासाठी आवश्यक तो निधी तात्काळ द्यावा, अकोट, खांडवा या नवीन मार्गाला पूर्वीच मंजुरी आलेली आहे निधी अभावी हे काम रेंगाळलेले आहे ते तात्काळ पूर्ण करावे, नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी रेल्वे विभागाकडे तात्काळ जमा करुन या कामाला गती द्यावी, परळी येथे लोकोशेड उभारावे, पूर्णा येथील लोकोशेडच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा या व इतर मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
या मुक आंदोलनात माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, इंजि.द.मा.रेड्डी, प्रा.अशोक सिध्देवाड, रेल्वे संघर्ष समितीचे शंतनु डोईफोडे, प्रा.राजाराम वट्टमवार, मजविप शहर अध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, ऍड.धोंडीबा पवार, डॉ.कुंजम्मा काब्दे, डॉ.पुष्पा कोकीळ, प्रा.के.एस.धुतमल, श्याम निलंगेकर, डॉ.किरण चिद्रावार, चंपतराव डाखोरे, इंजि.चंद्रशेखर अय्यर, प्रभाकर लखे, संभाजीराव शिंदे, रवी भोकरे, एम.आर.जाधव, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.संतोष अरुटवार, कॉ.अख्तर पठाण, कॉ.जमाल पठाण, कॉ.गणेश सैबी, शंकर महाजन, उमाकांत जोशी, मारोती मस्के यांच्यासह विकासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *