नांदेड(प्रतिनिधी)-अख्खा कंटेनर पळविल्यानंतर सोनखेड पोलीसांनी तो कंटेनर पकडला. या प्रकरणात सहा आरोपी आहेत असे पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिले आहे. त्यातील पकडलेल्या एका दरोडेखोराला नायगाव न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.या प्रकरणातील दरोडेखोरांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली होती.
संतोष विरभद्र बोडके रा. पोखर्णी ता.बिलोली ह.मु.सिलवासा, दादरानगर हवेली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जानेवारीच्या रात्री 11.30 वाजता आपला कंटेनर क्रमांक डीएन09 यु.9153 घेवून नरसी ते मुखेड रस्त्यावरून जात असतांना रातोळी शिवारातील मन्याड नदीच्या पुलावर एक चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.24 आले या पुढचा नंबर संतोष बोडके यांना दिसला नाही. त्यांनी कंटेनरसमोर ती चार चाकी गाडी आडवी उभी करून कंटेनरच्या खिडकीचे काच फोडले आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 50 हजार रुपये रोख रक्कम 5 हजार रुपयांचा मोबाईल आणि 2 हजार रुपयांची मनगटी घड्याळ यासह 27 लाख रुपयांचा कंटेनर पळवून नेला. दरोडेखोरांनी संतोष बोडकेला सुध्दा बळजबरीने इंडिका कारमध्ये कोंबुन सोबत नेले. शिखारा ता.मुखेड भागात त्यांना सोडून दिले. पुढे हा कंटेनर पोलीसांच्या तत्परतेने सोनखेड पोलीसांनी पकडला.
या संदर्भाने नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11/23 भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 365, 341 आणि 427 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांच्याकडे देण्यात आला. या पोलीस प्राथमिकीमध्ये दरोडेखोरांची सहा नावे अशी आहेत. गंगाधर बळीराम सालकमवाड रा.डेरला ता.लोहा, संजय धुमाळे रा.वाघाळा, गंगाधर कदम (माळी पाटील), नामदेेव संभाजी मुंडे रा.कौठा नांदेड, बालाजी श्रीरंग गाडगे रा.टेंभुर्णी ता.नायगाव, आनंदा मरीबा बोयवारे रा.टेंभुर्णी ता.नायगाव सोबत दोन आणखी दरोडेखोर आहेत त्यांची नावे माहित नाहीत.
दरोडेखोरांमधील पकडलेला आरोपी गंगाधर बळीराम सालकमवाड यास अभिषेक शिंदे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी आज 1 फेबु्रवारी रोजी नायगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीची गरज लक्षात घेता सालकमवाड यास 4 दिवस अर्थात 5 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अख्खा कंटेनर पळवणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला 5 फेब्रुवारी पर्यँत पोलीस कोठडी