पोलीसांवर हल्ला करून गणवेशाशी झटापट करणाऱ्याला 10 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अपघात स्थळाची चौकशी करतांना पोलीस अंमलदाराच्या तोंडावर ठोसा मारुन जखमी करून पोलीस गणवेशाशी झटापट करणाऱ्या सन 2014 मध्ये 28 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर. पटवारी यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दि.4 ऑगस्ट 2014 रोजी पोलीस ठाणे विमानतळमध्ये शासकीय वाहन क्रमांक एम.एच.26 एल.1619 वर चालक असलेल्या काझी अनवर अजहर पाशा यांनी दिलेल्यातक्रारीनुसार पहाटे 5 वाजता त्यांना माहिती मिळाली की, आसना टी.पॉईंट सांगवी येथे अपघात झाला आहे. त्यावेळी चालक असलेले काझी अनवर आणि त्याचे सहकारी पोलीस अंमलदार त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी एम.एच.20बी.जी.5676 या चार चाकी वाहनाचा ऍटो क्रमांक एम.एच.15 ए.एस.6898 सोबत अपघात झाला होता. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले ऍटो उभा होता चार चाकी गाडीने उभ्या ऍटोला ठोकले आहे. याबद्दल चार चाकी गाडीचा चालक विजय बापूराव चकोर (28) रा.पुष्पनगर पावडेवाडी नाका नांदेड यास विचारणा केली असता तो उद्‌टपणे बोलत होता. पोलीस वाहनाचे चालक काझी अनवर यांनी तु दारु पिलेला आहेस काय अशी विचारणा केली तेंव्हा विजय चकोरने सांगितले की, तु काय माझ्या तोंचा वास घेतोस काय आणि बोलत बोलत काझी अनवरच्या तोंडावर ठोसा मारुन त्याला जखमी केले. तसेच त्यांचा पोलीसी गणवेश पकडून झटापट केली.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 105/2014 दाखल झाला. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 353, 332, 323 जोडली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पिसे यांनी करून विजय बाबूराव चकोरविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी चार साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. 4 ऑगस्ट 2014 रोजी घडलेल्या घटनेचा निकाल 4 फेबु्रवारी 2023 रोजी तब्बल 9 वर्षांनी लागला. त्यात न्या.आर.आर.पटवारी यांनी पोलीसांवर हल्ला करणाऱ्या विजय बाबूराव चकोरला सहा महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक मोहन राठोड यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *