नांदेड(प्रतिनिधी)-जनतेला मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज पडू नये म्हणून मुख्यमंत्री सचिवालय जिल्हास्तरावर सुरू करण्यात आले आहे. जनतेने आपल्या मुंबईला पाठवायच्या तक्रारी जिल्हाच्या सचिवालयात द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.या सचिवालयात उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
16 डिसेंबर 2022 पासून नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. राज्यभर सुध्दा प्रत्येक जिल्ह्यात असे सचिवालय सुरू झाले आहेत. ज्या नागरीकांना मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांकडे आपले अर्ज पाठवायचे असतात त्यांनी आपले अर्ज तेथे न पाठवता थेट जिल्ह्यातील मुख्यमंत्री सचिवालयात द्यावेत त्यावर एका महिन्यात कार्यवाही होईल असे अपेक्षीत आहे ही माहिती अभिजित राऊत यांनी सांगितली. जिल्हास्तरावरील अर्ज असेल तर त्याबाबतची संपुर्ण माहिती संबंधीत विभागाकडून घेवून त्याचा एक संपुर्ण सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर तो अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविला जाईल.
मुख्यमंत्री सचिवालयात येणारे अर्ज घेवून त्यावर जनतेशी चर्चा करण्यासाठी दर सोमवारी आणि गुरूवारी जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी हजर राहतील. आजपर्यंत या सचिवालयाकडे 38 अर्ज आले आहेत. त्यातील काही अर्जांवर अहवाल तयार झाला आहे. तो अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविला जाणार आहे.
तुरूंगात झालेल्या मारहाण प्रकरणाच्या वेळी मी हजर नव्हतो असे उत्तर अभिजित राऊत यांनी एका प्रश्नावर दिले. तुरूंगाच्या आत राहणाऱ्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे असे राऊत म्हणाले.या पत्रकार परिषदेस जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती होती.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलाठ्याने महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या र्दुव्यवहारासाठी त्याला निलंबित केले आहे. त्याला बडतर्फीपर्यंत नेणार आहोत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मनपाकडून 137 भुखंडधारकांचे समाधान होत नसेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे अभिजित राऊत यांनी सांगितले.