नांदेड(प्रतिनिधी)-हरीनाम सप्ताहाला गेलेल्या कुटूंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.भोकर शहरातील एका कार्यालयाचे टीनपत्रे कापून त्यातून संगणक साहित्य, 16 हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी लांबले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेणुका माता मंदिराजवळ धनेगाव येथे घर असलेल्या आकाश साहेबराव गरुड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 वाजता ते आणि त्यांचे सर्व कुटूंबिय आपल्या घराला कुलूप लावून वाजेगाव येथे सुरू असलेल्या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्यासाठी गेले होते.8 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 वाजता ते परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होते. त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे अधिक तपास करीत आहेत.
प्रकाश शंकरराव फुलझेले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7-8 फेबु्रवारीच्या रात्री वर्ल्ड व्हिजन इंडिया शाखा नावाच्या कार्यालयाचे टीनपत्रे कापून त्यात ठेवलले संगणक साहित्य आणि दोन बॅटऱ्या असा 16 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडून 2 लाख 47 हजारांचा ऐवज लंपास