नांदेड(प्रतिनिधी)-8 फेबु्रवारी रोजी सिडको स्मशानभुमी रस्त्यावर बुलेट दुचाकीवर येवून एका व्यक्तीच्या खिशातील 7 हजार रुपये लुटून नेणाऱ्या गुन्हेगाराला पकडणाऱ्या चार पोलीसांचे कौतुक करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रत्येकाला 5 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव केला आहे.
दि.8 फेबु्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ऍटोतून नांदेडकडे येणाऱ्या शेख मैनोद्दीन शेख राजेसाब यास मारहाण करून तीन जणांनी त्याच्या खिशातील 7 हजार रुपये रोख रक्कम लुटली होती. सोबतच शेख मैनोद्दीनच्या गळ्यावर चाकूने वार केला होता. ऍटोच्या काचा फोडल्या होत्या. ही माहिती कळताच शहर वाहतुक विभाग इतवाराचे पोलीस अंमलदार दिलीप मुत्तेपराव श्रीमनवार, पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार श्रीनिवास दत्तात्रय रामोड, बालाजी बळीराम वाघमारे, आणि शेख मुजीबोद्दीन शेख फयाजोद्दीन यांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने बुलेट या महागड्यावर येवून लुट करणाऱ्या तीन गुन्हेगारा पैकी एकाला घटनास्थळी पकडले. सोबत बुलेट दुचाकी जप्त केली. ही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या चार पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या कार्यालयात बोलावून त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करतांना भविष्यात सुध्दा अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.