गोरक्षकांचा याप्रकरणाशी काही संबंध नाही
नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक यांचे निलंबन त्यांनी आपल्या कामात केलेल्या चुकीसाठी आहे. गोरक्षकांच्या प्रकरणात रघुनाथ शेवाळे यांनी मारहाण केली नाही अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे सुध्दा उपस्थित होते.
दि.4 फेबु्रवारी रोजी झालेल्या एका मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या नंतर विश्र्व हिंदु परिषदेने ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी मारहाण केलेली मंडळी गोरक्षक आहेत म्हणून त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या संदर्भाची चौकशी करण्याचे आदेश कंधार येथील पोलीस उपअधिक्षक मारोती थोरात यांना दिले होते. त्यानंतर अगोदर रघुनाथ शेवाळे यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आणि 12 फेबु्रवारी रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधिक्षकांनी काढले.
आज 13 फेबु्रवारी रोजी पोलीस अधिक्षकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 3 फेबु्रवारी रोजी शिवणी येथील यात्रेत शिवणी आणि झळकवाडी या दोन गावातील युवकांमध्ये वाद झाला. तेथील पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्षांनी विशाल मेडेवार, सुर्यकांत कार्लेवाड, आदर्श बादरवाड, मनिकंठ कोंडलवाड, लक्ष्मण कोर्लेवाड, सुरेश कोर्लेवाड आणि झळकवाडी येथील तक्रारदार चंपती बाबूराव झाडे, मंगेश रामकिशन वागदरकर, सचिन दिगंबर डुकरे, तुकाराम हौसाजी झळके या सर्वांना पोलीस ठाणे ईस्लापूर येथे आणले आणि गावकऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांना सांगितले की, यातील काही युवक विद्यार्थी आहेत. गुन्हा दाखल झाला तर त्यांचे भविष्य अंधारमय होईल. त्यामुळे त्यांना समज द्या आणि आपसात समेट घडवून आणा अशी विनंती केली. हा प्रकार गोरक्षेतून नव्हे तर अंतर्गत वादातून घडलेला आहे.
गावकऱ्यांनी काय सांगितले, कोणाच्या भविष्याचा काय विचार या सर्व बाबींना बाजूला ठेवत रघुनाथ शेवाळे यांनी दोन्ही बाजूंची तक्रार घेवून गुन्हे दाखल करणे ही त्यांची जबाबदारी होती. सामाजिक काम करतांना गावकऱ्यांचा दबाव आला आणि शेवाळे यांनी केलेला मिटवा मिटवीचा प्रयत्न चुकीचा आहे. या सर्व मुलांमधील विशाल मेडेवार यांचे काका कोणत्या तरी संस्थेचे सदस्य आहेत. या युवकांचा गोरक्षक या शब्दाशी काही एक संबंध नाही अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.1 फेबु्रवारी रोजी गोवंशाचे प्रकरण घडले, 3 फेबु्रवारी रोजी शिवणी गावात वाद झाला आणि 4 तारखेला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत त्या व्हिडीओची संपुर्ण तांत्रिक सखोल तपासणी करण्यात येईल. प्राथमिक चौकशीत आढळलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरुन रघुनाथ शेवाळे यांनी पोलीस अधिकारी म्हणून आपल्या कर्तव्यात केलेल्या चुकीसाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रक्रियेला कळवा कार्यवाही होणारच-कोकाटे
सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या बद्दलच्या माहितीसाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले त्यात अनेक मुद्दे होते. त्या मुद्यांमध्ये अवैध गौण खनीज वाहतूक, शहरातील विविध उड्डाणपुलाखाली चालणारी अवैध कामे या विषयांवर बोलतांना पोलीस अधिक्षक म्हणाले, तुम्हाला काही माहिती असेल तर ती एका प्रक्रियेनुसार अंमलात येते. त्यातून भारतातील प्रत्येक नागरीकाला 112 आणि 100 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. सोबतच मी जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी तयार आहे. तेंव्हा आपण एका योग्य पध्दतीनुसार चुकीच्या कामांची माहिती द्या, तक्रार करा मग मात्र चुकीचे काम, अवैध धंदे कोणाचेही असो कार्यवाही होणारच.
रघुनाथ शेवाळेंकडे सुध्दा काही ऑडीओ आहेत?
ईस्लापूर पोलीस ठाण्यातील प्रकार 4 फेबु्रवारी रोजी घडला. व्हिडीओ तेथेच असणाऱ्यापैकी कोणी तरी रेकॉर्ड केला. तो काही ठिकाणी व्हायरल झाला. त्यानंतर काही बोरु बहाद्दरांनी रघुनाथ शेवाळेंना कॉल केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यावेळी बोरु बहाद्दरांनी काय मागितले, शेवाळे देतो म्हणाले की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. काही बोरुबहाद्दरांना याबद्दलची बातमी लिहिण्यासाठी विनंती केली असता ती विनंती वाऱ्यावर विरुन गेली. त्यानंतर 10 फेबु्रवारी रोजी वास्तव न्युज लाईव्हला ही माहिती प्राप्त झाली आणि वास्तव न्युज लाईव्हने सर्वप्रथम या बातमीला प्रसिध्द केले. त्यानंतर अनेक प्रसार माध्यमांनी सुध्दा ही बातमी आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली. पण 4 ते 11 फेबु्रवारी असे सहा दिवस ही बातमी का लपलेली राहिली याचा उलगडा मात्र रघुनाथ शेवाळे यांच्याकडे असलेल्या ऑडीओतून समोर येईल. याबाबत सुध्दा चौकशीमध्ये विचारपुस व्हायला हवी. खंडणीखोरांविरुध्द अनेक गुन्हे दाखल होता. यात सुध्दा कोणी खंडणीखोर आहे काय याची सुध्दा चौकशी करून त्यांचे पितळ उघडे पडले पाहिजे.
रघुनाथ शेवाळेचे निलंबन पोलीस कर्तव्यात कसुर केल्यामुळे- पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे