लातूर,(प्रतिनिधी)- पोलिसाच्या पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या महिला वरिष्ठ लिपिका विरुद्ध लाचलुचपात प्रतिबंधक विभाग लातूर यांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील त्या लाच मागणाऱ्या महिलेला अटक केली आहे. मुळात या महिलेची नेमणूक नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील आहे. सध्या त्या प्रतिनियुक्तीवर लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत.
लातूर येथील एका पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीचे मेडिकल बिल मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये लाच कल्याणी सोनवणे यांनी मागितली. तसेच जानेवारीमध्ये दाखल केलेल्या इतर तीन वैद्यकीय बिलांच्या संचिका बिना त्रुटी शल्यचिकित्सक लातूर यांच्याकडे पाठवण्यासाठी 22 हजार रुपये लाच मागितली. हा प्रकार कल्याणी जितेंद्र सोनवणे (41) वरिष्ठ लिपिक (वर्ग 3) मूळ नेमणूक पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, प्रतिनियुक्ती पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांनी केला. याबाबतची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांनी पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे,अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दोन वेळेस लाचेचा सापळा रचला पण कल्याणी सोनवणे ला शंका आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे कल्याणी सोनवणे विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे. या सर्व कार्यवाहीसाठी पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि त्यांच्या सहकारी पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी मेहनत घेतली.