अर्धापूर,(प्रतिनिधी)-चॉकटेलचे अमिष दाखवून एका नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या नराधमावर रात्री उशिरा पोक्सो प्रमाणे अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी अर्धापूर तालुक्यातील एका 6 वर्षाच्या चिमुकलीस चॉकटेलचे अमिष दाखवून गुन्ह्यातील नराधम आरोपी राहुल संजय इंगोले (वय २०, व्यवसाय मजुरी) याने गावातील बस स्टॅन्डकडे नेले. अल्पवयीन मुलीस रोडवरील पुलाखालील पाईपमध्ये नेले. आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून या नराधमाने या चिमुकलीस मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना कळताच गावकरी संतप्त झाले. आरोपीचा शोध घेऊन ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी देऊन नराधमास अटक करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात दि.13 फेब्रुवारी रोजी रात्री पोक्सो अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कलम 376 (1), (2) (आय) (जे), 323 भा.दं.वि. सह कलम 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, पो. उपनिरीक्षक शिवाजी वड, जमादार राजेश घुन्नर,गुरुदास आरेवार यांनी सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला आणि गुन्ह्यातील आरोपी राहुल संजय इंगोले यास अटक केली आहे.