नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांसाठी असलेल्या कॅन्टीनमध्ये 20 लाख 78 हजार 112 रुपयांचा घोळ करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अंमलदाराला प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
मागे काही वर्षांपूर्वी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 552 रुपयांमध्ये रेमंड कंपनीचे कापड गणवेश तयार करण्यासाठी खरेदी करण्याची योजना आली होती.या योजनेला पूर्ण करण्याची जबाबदारी पोलीस मुख्यालयात असलेल्या कॅन्टीन वर देण्यात आली होती. त्यावेळी पोलिस अंमलदार रामकिशन गंगाराम जाकुलवार हे कार्यरत होते. त्यावेळी पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे हे होते. पोलिसांना मिळणाऱ्या गणवेशा संदर्भाने 470 पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 552 रुपये जमा करण्यात आले परंतु त्यांना गणवेशाचे कापड देण्यात आले नाही आणि हा घोळ झाल्याचे दिसले.
झालेल्या घोळाची पूर्ण तपासणी करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक मुख्यालय यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने याबाबत 20 लाख 78 हजार 112 रुपयांचा घोळ झाल्याचा निष्कर्ष दिला त्यानंतर पोलीस कल्याण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी 7 जून 2022 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे आणि पोलिसा अंमलदार रामकिशन गंगाराम चाकुलवार विरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 409,420,468,471,477 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 193 /2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे यांच्याकडे देण्यात आला.
या प्रकरणातील राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे यांना जिल्हा न्यायालय नांदेड यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. पोलीस अंमलदार रामकिशन जाकुलवार नोव्हेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे यांनी रामकिशन जाकूलवारला 12 फेब्रुवारी रोजी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी रामकिशन जाकुलवारला 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
या अगोदर रामकिशन जाकूलवार वाहतूक शाखेत कार्यरत असताना चुकलेल्या वाहन चालकांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम त्यांनी शासनाच्या खात्यात जमा केली नव्हती. त्यावेळेस सुद्धा त्यांनी केलेला घोळ 7 ते 9 लाख रुपयांचा होता.तो गुन्हा क्रमांक 112/ 2012 असा आहे. तो गुन्हा सुद्धा वजीराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात सुद्धा रामकिशन जाकुलवारला पोलीस कोठडी प्राप्त प्राप्त झाली होती.