नांदेड(प्रतिनिधी)-जगाने प्रथम आणि द्वितीय असे दोन युध्द पाहिले. त्यानंतर सिरीयावर अतिरेक्यांचा ताबा पाहिला त्या आगोदर दक्षीण कोरीयावर झालेला बॉम्ब हल्ला पाहिला, असे अनेक युध्द जगाने अनुभवले आहेत. सध्या जगात गाजत असलेले युध्द रशिया विरुध्द युक्रेन असे आहे. आता दोन जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्याचे युध्द सुरू झाले आहे. या युध्दात जिंकेल कोण ? या प्रश्नाचे उत्तर रशिया विरुध्द युक्रेन युध्द असे होवू नये म्हणजे कमावले. हा सर्व अभिलेख स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या खुर्चीसोबत जोडून लिहिला आहे. असे एक नवीन युध्द नांदेड पोलीस परिक्षेत्रात पाहायला मिळणार आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेवर रेकॉर्ड ब्रेक ताबा ठेवण्याचे नाव द्वारकादास श्री.गोविंदरावजी चिखलीकर यांच्या नावावर काही दिवसातच कोरले जाणार आहे. हा तयार होणारा शिलालेख रोखण्याची ताकत कोणाची आहे असे दिसत तर नाहीच. किंवा तो मोडण्याची ताकत कोणात पुढे सुध्दा येणार आहे असे वाटतच नाही. परंतू आभाळात उडणाऱ्या बगळ्यांची संख्या कधीच मोजता येत नाही हे सत्य असले तरी, आम्ही ती संख्या मोजू शकतो असे फोल दावे करणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाही. अशा पध्दतीने मी कसा वरचढ आहे. हे दाखविण्याच्या नादात अशा महाभागांची नेहमीच चेष्टा होत असते, आणि अशीच चेष्टा करून घेण्याच्या तयारीला श्री.पंडीतजी श्री.सोपानरावजी कच्छवे लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचा पदभार दिलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच नांदेड जिल्ह्यात सुध्दा नवीन पदस्थापना होणार आहे. त्यासाठी अनेक जणांनी आप-आपल्या गुडघ्याला बाशींगे बांधली आहेत. बाशींगे बांधणाऱ्यांमध्ये एक नाव श्री.पंडीतरावजी कच्छवे यांचे पण आहे. आपल्याला नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार मिळावा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करणे सुरू ठेवले आहे. सन 2005 मध्ये बदल्यांचा कायदा तयार झाला. त्या कायद्यानुसार सेवा काळाच्या शेवटच्या कालखंडात संबंधीत अधिकाऱ्याच्या पसंदीने त्याला नियुक्ती मिळावी असा नियम बदलीच्या कायद्यात आहे. त्याअनुरूप सन 2018 मध्ये पोलीस महासंचालकांनी परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे श्री.पंडीतरावजी कछवे यांची इच्छा पुर्ण व्हावीच असे आम्हाला सुध्दा वाटते. या उलट बदलीच्या कायद्यात असलेल्या नियमांची आणि परिपत्रकाची अंमलबजावणी करतांना त्या कायद्यातील नियमाप्रमाणे द्वारकादास चिखलीकर यांना सुध्दा संधी मिळावी हा त्यांचा अधिकार आहे. मग आम्ही स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी युध्द लिहिले असेल तर त्यात चुकीचे काय? सध्याचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची सेवानिवृत्ती दिनांक 30 सप्टेंबर 2023 अशी आहे. तर श्री.पंडीतरावजी कछवे यांच्या सेवानिवृत्तीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 अशी आहे. मग पंडीतरावजी कछवे यांना संधी मिळावी हे आम्ही मांडत आहोत. सोबतच आम्ही आमच्या शब्दांना दिलेल्या आकारामध्ये द्वारकादास चिखलीकरांचा हक्क खपवला जावू नये हे सुध्दा मांडत आहोत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 फेबु्रवारी रोजी अंधार पडल्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयात नांदेड जिल्ह्यातील एक महान व्यक्तीमत्व आले होते. आणि त्या महान व्यक्तीमत्वाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना स्थानिक गुन्हा शाखेत सध्या हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक असलेले श्री.पंडीतरावजी कछवे यांना नियुक्ती द्यावी अशी विनंती की, मागणी की, आदेश की, आणखी काय दिले याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. पण त्या भेटीचा मतीतार्थ श्री.पंडीतरावजी कछवे यांना स्थानिक गुन्हा शाखा नांदेड येथे नियुक्ती मिळावी असाच आहे. पण त्या महान व्यक्तीमत्वाला हे माहिती नाही काय? की, नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्यानंतरच श्री.पंडीतरावजी कछवे यांना स्थानिक गुन्हा शाखा मिळावी अशी अपेक्षा करता येईल. त्या महान व्यक्तीमत्वाने पोलीस अधिक्षकांना सांगण्याऐवजी सध्याचे नांदेड पोलीस परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरिक्षक प्रसन्ना साहेब यांना असे सांगायला पाहिजे होते की, हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेसह पंडीतरावजी कछवे यांना नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचा सुध्दा अतिरिक्त पदभार द्यावा. असे झाले असते तर त्या महान व्यक्तीमत्वाच्या नावावर सुध्दा एक अभिलेख कोरला गेला असता की आपल्या बोटातील एका अतिमहान पोलीस निरिक्षकांना त्यांनी दोन जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार मिळवून दिला. तर हा अभिलेख सुध्दा ईतिहास झाला असता. ज्यांना नशीबाने मिळते ते नशीबान असतात जे घाम गाळतात ते ईतिहास तयार करतात असे म्हटले जाते आणि असेच व्हावे अशी आमची पण इच्छा आहे. अशा पध्दतीने आम्ही युध्दाचे अनेक उदाहरण लिहिले त्याप्रमाणे आता नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर बसण्यासाठी सुध्दा युध्द दिसणार आहे. महत्वाची बाब या युध्दामध्ये द्वारकादास चिखलीकर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांचा विचार कोणी करतच नाही. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदलीचा कायदा 2005 आणि बदलीचे परिपत्रक 2018 नुसार माझी बदली करण्यात येवू नये असा अर्ज त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात आज एकादशीच्या दिवशी दिल्याची माहिती आहे. पुढे असे काही घडलेच तर त्यांचे घर औरंगाबादमध्ये आहे. त्यांना नांदेडमध्ये राहण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. औरंगाबाद येथील त्यांच्या घरपासून मॅट कोर्ट पायी जाण्याइतके जवळ आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वीच मॅट कोर्टांच्या वकीलांकडे काही वकील पत्र स्वाक्षरी करून दिले आहेत. काही हिरव्या लिगल साईज कागदांवर स्वाक्षऱ्या करून दिल्या आहेत. आवश्यक असलेल्या कागदांच्या झेरॉक्सप्रती सुध्दा औरंगाबादला दिल्या आहेत. त्यांचे प्रकरण मॅट कोर्टात दाखल करण्यासाठी त्यांना पोलीस भाषेतील निरंक अशी फिस लागणार आहे. या सुविधांचा सुध्दा विचार त्या महान व्यक्तीमत्वाने करण्याची गरज आहे. मागे असेच एक महान पोलीस निरिक्षक याच अतिमहत्वपुर्ण व्यक्तीमत्वाने स्थानिक गुन्हा शाखेत आणले होते. त्यांच्या अभिलेख सुध्दा उल्लेखनिय आहे. त्यांचे नाव स्थानिक गुन्हा शाखेच्या बोर्डावर कोरलेले आहे. फक्त 13 दिवसांसाठी. पुढे सुध्दा असे काही घडणार नाही असे आज म्हणता येणार नाही. त्यापेक्षा असे काही घडू नये असा प्रयत्न करण्याची गरज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना आहे. पण नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा खुर्चीवर ताबा मिळविण्यासाठी युध्द होणार हे खरे ! आम्ही लिहिलेल्या युध्दांमध्ये जे इतर पोलीस निरिक्षक आपल्या गुडघ्यांना बाशींगे बांधून तयार होते. त्यांचा हिरमोड मात्र सुनिश्चत आहे. त्यांच्या भविष्यातील होणाऱ्या हिरमोडासाठी आम्ही आजच खेद व्यक्त करत आहोत. संत वचनांप्रमाणे “ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान’ अशीच शब्द रचना त्यांच्यासाठी योग्य आहे असे वाटते.
स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या खुर्चीसाठी होणार रशिया विरुध्द युक्रेनसारखे युध्द !