नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे हे 16-17 फेबु्रवारीच्या रात्री धर्माबाद आणि बिलोली पोलीस उपविभागात रात्रगस्त करत असतांना एका हिरव्या रंगाच्या स्कॉरपिओ गाडीवर त्यांनी फायरिंग केली. हिरव्या रंगाच्या गाडीने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्या गाडीने शासकीय वाहनांना धडक दिली, पोलीस बॅरीकेटला धडक दिली. तरी सुध्दा पोलीसांनी हिम्मत न हारता त्या गाडीला अखेर ताब्यात घेतले. एक जण बिलोली पोलीसाच्या ताब्यात आहे तर एकाला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आणि तीन जण फरार झाले आहेत.
16-17 फेबु्रवारीच्या रात्री बिलोली आणि धर्माबाद पोलीस उपविभागात रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांची नाईटगस्त होती. ते आपल्या शासकीय वाहनात पोलीस अंमलदार शेख हबीब आणि पी.एम.आडे यांच्यासोबत गस्तीला निघाले. त्यांना नरसी शासकीय विश्रामगृहासमोर एक हिरव्या रंगाची गाडी क्रमांक एम.एच.04 पी.क्यु.2479 हळूहळू बिलोलीकडे जातांना दिसली. संकेत दिघे यांनी आपल्या गाडीच्या ध्वनीक्षेपकावरुन त्या हिरव्या रंगाच्या गाडीला थांबण्यास सांगितले. पण गाडी भरधाव वेगात बिलोलीकडे पळाली. संकेत दिघे यांनी त्या गाडीचा पाठलाग केला आणि बिलोली पोलीसांना नाकाबंदी लावण्यास सांगितले. बिलोली शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर बिलोली पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ईबितदार,पिटलेवार यांनी बॅरीकेट लावून चार चाकी वाहनांना थांबवत होते. परंतू हिरव्या गाडीने बॅरीकेटला धडक देवून भरधाव वेगात बोधनकडे पळाली. संकेत दिघे यांनी त्या गाडीचा पाठलाग कार्ला येथील चेक पॉईंटपर्यंत केला. पण ती गाडी गायब झाली. तेंव्हा ते परत येत असतांना कुंडलवाडी पोलीसांनी वायरलेसवर माहिती प्रसारीत केली. ती हिरवी गाडी कुंडलवाडीकडून पुन्हा बिलोलीकडे येत आहे. तेंव्हा संकेत दिघे आणि त्यांच्यासोबतचे पोलीस अंमलदार कांबळे, मेडेवार यांनी रस्ता आडवला. पुढे संकेत दिघे, बिलोली पेालीस आणि मागे कुंडलवाडी पोलीस अशा परिस्थितीत ही हिरवी गाडी समोर आली तेंव्हा तिला पोलीसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. पण न थांबता त्यांनी शासकीय वाहनाला धडक दिली त्यावेळी संकेत दिघे यांनी आपल्या पिस्तुलमधून गाडीवर गोळी झाडली. तरी पण ती हिरवी गाडी पळून गेली. या कठीन प्रसंगात ही गाडी पुढे नरसीकडे गेले. येथे नरसी येथील पोलीस अंमलदार रिंदकवाले, बोडके आणि कोरके यांनी इकडे नाकाबंदी लावली. तेंव्हा ती गाडी पुन्हा लोहगावकडून युटर्न घेवून बिलोलीकडे पळाली. दरम्यान संकेत दिघे यांनी एक ट्रक रस्त्यावर आडवा लावून अखेर त्या गाडीला रोखलेच. त्यातील एक जण दिघे पथकाच्या ताब्यात आला. पण चार जण पळून गेले.
घडलेल्या घटनेनुसार संकेत दिघे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फिरोज जबरा रा.भिवंडी जि.ठाणे, कयुम भटीयाली रा.मुंब्रा जि.ठाणे, एजाज कुरेशी होल रा.भिवंडी जि.ठाणे, ताहेर कुरेशी नांदेड आणि आणखी एक नाव माहित नसलेला इसम अशा पाच जणांनाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील एकाला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे.
भिवंडी आणि नांदेड येथील लोकांचा आपसातील काय संबंध आणि त्यांनी कोणत्या स्वरुपासाठी, कोणत्या महत्वाच्या कामासाठी एवढ्या दुर आले आणि गाडी का हळूहळू चालवत होते. या संदर्भाचा सविस्तर शोध होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून नांदेडमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा बसेल. घटना घडल्यावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, परिस्थिती जानून घेतली आणि आपल्या अधिकाऱ्यांना योग्य सुचना दिल्या आहेत.
हिरव्या रंगाच्या चार चाकी वाहनावर एपीआय संकेत दिघेंनी केली फायरींग; दोन जण पोलीसांच्या ताब्यात