छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात आणि जिल्ह्यात आज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस अधिक्षक कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. वजिराबाद पोलीस ठाण्यात सुध्दा छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली.

काल रात्री 12 वाजेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाची सुरुवात झाली. महिलांनी रात्री मशालीसह छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले. आज सकाळपासून असंख्य राजकीय नेते, व्यापारी, युवक, महिला, युवती आणि बालकांनी छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवरायांना पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. काहींनी मोटारसायकल रॅली काढली, मोटारसायकलींवर छत्रपती शिवरायांचे चित्र असलेले झेंडे लागलेले होते. अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी झाली.

पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक सौ.एस.एम.कलेटवाड, कमल शिंदे, पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. पोलीस विभागातील जनसंपर्क विभागाचे पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे आणि विनोद भंडारे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट केले.

वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, रमेश खाडे, शिंगे, पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीपसिंघ सोढी यांच्यासोबत सर्व पोलीस अंमलदारांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत सर्वांनी गायले.

समाज कल्याण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्यालयात समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यशैली व बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण निरीक्षक आर.डी सुर्यवंशी, पी.जी. खानसोळे, कनिष्ठ लिपीक दिनशे दवणे, विजय गायकवाड, रामदास विश्वनाथ पेंडकर, संगणक ऑपरेटर, शिपाई शशिकांत वाघमारे, शेख रहीम, तालुका समन्वयक, यादव ब्रिक्स व्यवस्थापक, विठ्ठल जाधव व इतर कर्मचारी यांनी उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *