दवाखाना फोडून 12 लाख 50 हजारांचे नुकसान करणारे चार जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- एका व्यक्तीच्या मृत्यूचा राग मनात धरुन देगलूर येथील एका वैद्यकीय व्यवसायीकाला मारहाण करून त्या दवाखान्याची तोडफोड करून 12 लाख 50 हजारांचे नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. पकडलेल्या चार जणांना देगलूर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
डॉ.मयुर प्रकाशराव कद्रेकर यांचे कद्रेकर हॉस्पीटल देगलूरच्या कलामंदिर पाठीमागे आहे. दि.18 फेबु्रवारीच्या सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास त्यांच्या दवाखान्यात काही लोकांनी गर्दी केली.त्यांच्या म्हणण्यानुसार ही बेकायदेशीर मंडळी शेख कलीम नावाचा व्यक्ती मरण पावल्याचा राग त्यांच्या मनात होता. डॉ.मयुर कद्रेकर यांना आणि त्यांच्या सहकारी लोकांना शिवीगाळ करून या जमावाने आपण थापड बुक्यांनी मारहाण केली. दवाखान्यातील अत्यंत महत्वाचे असलेले सर्व साहित्य तोडले. तोडलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत 12 लाख 50 हजार रुपये आहे. घटना घडताच देगलूरचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सचिन सांगळे, पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या सह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दवाखान्यात भेट दिली. डॉ.मयुर कद्रेवार यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी मोहम्मद अखील मोहम्मद आत्तार, अशफाक खदीर आत्तार हे दोन्ही मयत शेख कलीमचे भाऊ आणि महेंद्र बाशुमियॉ कासार तसेच इरशाद बाशुमियॉ कासार हे दोघे मयताचे मामा आहेत. या लोकांविरुध्द देगलूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 323, 427, 341,504 नुसार गुन्हा क्रमांक 84/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 च्या कलम 4 जोडण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
प्रकरणातील चार जणांना अटक केल्यानंतर पोलीसांनी आज त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देगलूर यांनी चार जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *