
लोहा(प्रतिनिधी)-ज्या चिखलीने नांदेड लोकसभा मतदार संघाला खासदार दिला. त्या चिखली गावात आज सुरू असलेल्या उच्च माध्यमिक (एचएससी/12 वी) परिक्षेतील दुसऱ्या भाषेतील परिक्षा सत्राच्या वेळेस बिनधास्तपणे कॉपी केली जात होती. कॉपीमुक्त परिक्षा राबवू असे वृत्त जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्द केले होते. पण चिखली गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या वृत्ताचे अवमुल्यनच झाले. चिखली गाव ईतिहासात कॉपीसाठी प्रसिध्द आहे.
आज 12 वी परिक्षेतील दुसरा भाषा पेपर सुरू झाला तेंव्हा चिखली गावातील शाळेवर सुरू असलेल्या कॉपी संदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये प्रत्येक माणुस बिनधास्तपणे वर्गाच्या खिडकीजवळ येत आहे. कॉपीचा कागद ठेवत आहे आणि बागेत फिरल्यासारखा परत जात आहे असे त्या व्हिडीओत दिसते. व्हिडीओमध्ये बाहेरच्या भागात असंख्य लोक कॉपी देण्याच्या तयारीत दिसतात. काही जणांनी आपल्या तोंडाला कपडा बांधलेला आहे. शिक्षक मुलांकडून कॉप्या घेत आहेत हे सुध्दा त्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. व्यासपीठावरून नुसत्या गप्पा मारल्याने गुणवत्ता येत नसते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपल्या गावातील मुलांनी कॉपी करण्यापेक्षा केंद्र शासनाकडून बिन परिक्षाच उत्तीर्ण करून घेण्याचा अद्यादेशच आणला तर किती छान होईल. मतदारांची संख्या मोठ्या संख्येत वाढेल आणि येणाऱ्या निवडणुकीत विजय प्राप्त करणे सहज शक्य होईल. पण दुर्देवाने चिखली हे गाव लोकसभा मतदार संघ लातूरच्या हद्दीत आहे.
