जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ग्रीलमध्ये पाय अडकलेल्याची अर्ध्या तासानंतर सुटका

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारापासून आत जातांना एका 52 वर्षीय व्यक्तीचा पाय लोखंडी ग्रिलमध्ये अडकला आणि अर्धातास झटल्यानंतर नांदेड महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने त्या व्यक्तीची सुटका केली. जिल्हाधिकारी सुध्दा याच गेटने दररोज आपल्या कार्यालयात प्रवेश करतात पण ते पायी जात नाहीत ना !
आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास गोविंद पौळ (52) हे व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात पायी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी होता. गोविंद पौळ हे प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये काम करतात. शिक्षणासंदर्भाचा रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी त्यांनी प्रवेश द्वारावरील ग्रीलवर पाय ठेवला आणि त्यांचा पाय घसरुन लोखंडांच्या दोन पाईपमध्ये अडकला. त्यांचे सहकारी आणि इतरांनी त्यांना बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण गोविंद पौळ यांचा पाय बाहेर काही निघेना. अखेर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि अग्नीशमन दलाने दोन लोखंडी पायमधील एक पाईप कापला आणि गोविंद पौळ यांची सुटका झाली.
जिल्हाधिकारी सुध्दा याच गेटमधून दररोज आपल्या कार्यालयात प्रवेश करतात पण त्यांना त्या ठिकाणी झालेली दुर्दशा दिसत नाही कारण ते वाहनात असतात. तरीपण आवाज तर येतोच ना. असो जिल्हाधिकारी कार्यालयातील काही लोक सांगत होते हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आलेले आहे ते होईलच. अर्ध्या तासाच्या त्रासानंतर घामाघुम झालेल्या गोविंद पौळ यांना अनेकांनी दिलासा दिला आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करत त्यांनी आपले पुन्हा घराकडे वळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *