पोलीस विभागातील बदल्यांचा सारीपाट आणि सोंगट्या एकाच्या आणि त्याच्यावर नियंत्रण मात्र दुसऱ्याचे?

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील बदल्यांचा सारीपाट पोलीस अधिक्षकांचा, त्यावर अंथरलेल्या सोंगट्या पोलीस अधिक्षकांच्याच पण त्या सोंगट्यांवर नियंत्रण करणारा कोणी दुसरा अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये समोर येत आहे. चार पोलीस निरिक्षक वगळता इतर सर्वांनी आपला नवीन पदभार जवळपास स्विकारलेला आहे. पण या चार जणांमध्ये कोणी कोठे मोदक सोडलेत आता याची चर्चा पण सुरू झाली आहे.
18 फेबु्रवारी रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक अशा तीन पदांच्या अधिकाऱ्यांचे खांदेपालट करतांना बदल्या केल्या. त्यात स्थानिक गुन्हा शाखेचे पेालीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण(मॅट) खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे आपल्या बदलीला स्थगिती मागितली आणि ती मंजुर झाली. 28 फेबु्रवारी ही त्याची पुढील सुनावणीची तारीख होती. पण दामिनी या चित्रपटात सन्नी देवलच्या तोंडी एक वाक्य आहे, “न्यायालय मे इन्साफ नहीं मिलता, मिलती है सिर्फ तारीख-पे तारीख’ या शब्दांप्रमाणे चिखलीकरांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 23 मार्च 2023 रोजी सुनिश्चित झाली आहे.
सारीपाटाच्या दुसऱ्या भागामध्ये पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या जागी भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांची नियुक्ती झाली. ते एक-दोन दिवसांसाठी नांदेडमध्ये आले होते. पण त्यांनी पोलीस ठाणे वजिराबादचा प्रभार मात्र स्विकारलेला नाही. येथेच तर पाणी मुरत आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारिपाटावरील सोंगट्या चालवणारा कोणी दुसरा आहे किंवा त्या दुसऱ्याने सारीपाटावरील सोंगाड्यांना स्तब्ध केले आहे.प्राप्त माहितीनुसार 4 तास वाट पाहायला लावून त्या दुसऱ्या व्यक्तीने सारीपाटातील एका सोंगट्याचे 30 किलो मिटरवरील अंतर आता 15 किलो मिटरचे करावे यासाठी घातलेली सोंगट्याची गळ मंजुर झाली म्हणे. असे झाले असेल तर गौहर हसन यांच्यासोबत काम करायला जाण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना नवीन दमदार सोंगटी शोधावी लागेल.
झालेल्या बदल्यांमध्ये काही जणंानी मोदक जमवले आहेत. या मोदकांची संख्या अर्धा खोका असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ज्याचा हा सारीपाट, ज्याच्या या सोंगट्या त्याने मात्र कोणाकडून काळी चहा सुध्दा पिलेली नाही मात्र इतरांनी अर्धा खोका मोदक जमवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या अर्धा खोका मोदक जमा करणाऱ्यांकडून लोकशाहीमध्ये केंद्र बिंदु असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या अधिकारांचे काय? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आपला जन्म आपल्या हाती नसतो, आपला मृत्यू आपल्या हाती नसतो अशा परिस्थितीत जन्म-मृत्यूच्या दरम्यान घडणाऱ्या घटना आपल्या मर्जीने घडतील अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *