पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना बनावे लागले श्रावण बाळ

नांदेड(प्रतिनिधी)-सतयुगात आपल्या अंध आई-वडीलांना कावडीत बसवून तिर्थ यात्रेसाठी घेवून फिरणारा श्रावण हा पुत्र भारतात नव्हे तर जगात प्रसिध्द आहे. पण आजच्या कलयुगात श्रावणच आपल्या 85 वर्षीय वडीलांना मारहाण करतो तेंव्हा त्या व्यक्तीचे श्रावणत्व नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्विकारले. आता आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पोलीसांनाच भविष्यात करावी लागेल की, काय असे दृश्य आजची घटना पाहुन समोर आले.
आज सकाळी 85 वर्षाचे एक व्यक्ती काठी टेकत-टेकत पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहचले. बऱ्याच लोकांनी या वयात या व्यक्तीचे काय काम पोलीस विभागाकडे असेल याचे आश्चर्य वाटत होते. हे 85 वर्षीय व्यक्ती भावसिंग रुपला राठोड रा.वाई बाजार ता. माहुर असे आहेत. या वयोवृध्द भावसिंगची पोलीस अधिक्षक कार्यालयातील हजेरी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यापर्यंत पोहचली तेंव्हा त्यांनी वजिराबादच्या पोलीसांना दिलेल्या आदेशानुसार पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, संतोष आरलुवाड हे पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहचले. पोलीस अधिक्षकांसोबत असलेल्या क्युआरटीच्या जवानांनी भावसिंगला वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन केले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रविण आगलावे यांनी भावसिंग राठोड यांची सर्वात अगोदर वैद्यकीय तपासणी केली आणि ज्येष्ठ नागरीक कायद्यानुसार पुढील प्रक्रिया पुर्ण होणार आहे. भावसिंग राठोड यांची भेट घेतली तेंव्हा ते सांगत होते की, माझा मुलगा श्रावण आणि त्याची दोन मुले अर्थात माझी नातू आहेत. माझी पत्नी अपंग आहे, मुलगी विधवा आहे, गावात अडीच एकर शेत आहे पण माझा मुलगा श्रावण आणि नातू आकाश हे मला नेहमीच माझा मृत्यू व्हावा अशी इच्छा व्यक्त करतात, मला मारतात, माझ्या पत्नीला सुध्दा मारहाण करत होते आणि याबाबतची तक्रार मी अनेकदा सिंदखेड पोलीस ठाण्याकडे केली पण त्यांनी काही दखल घेतली नाही म्हणूनच मला आज पोलीस अधिक्षक कार्यालयात यावे लागले. आपल्या घरची परिस्थिती, आपल्या जीवनाची कथा सांगतांना भावसिंगला अश्रु आवरत नव्हते. पण पोलीसांनी स्विकारलेले श्रावणत्व आम्ही लिहिले नाही तर आम्ही आमच्या स्वत:सोबत बेईमानी केल्यासारखे होईल.


भावसिंगची परिस्थिती ऐकल्यावर जग कोठे चालले आहे, समाजात आपल्या आई-वडीलांचा विचार करण्याची प्रवृत्ती का संपत चालली आहे हा प्रश्न समोर आला. भावसिंगचा पुत्र श्रावणला आपल्या आई-वडीलांना सांभाळणे होत नसेल तर शासनाने त्यासाठी वृध्दाश्रम तयार केले आहेत. भारतभरात अनेक जागी सामाजिक संस्थांचे वृध्दाश्रम आहेत. आपल्या आई-वडीलांना तेथे सोडून सुध्दा श्रावण आपल्या कुटूंबासोबत आनंद राहू शकला असता. सर्वात वाईट परिस्थिती वाई गावची आहे ज्या भावसिंगने आपल्या लहानपणापासून 85 वर्षाचे वय होईपर्यंत तेथे वास्तव्य केले तेथे कोणीही एक वाघ श्रावणाला या परिस्थितीचा जाब विचारायला तयार झाला नाही. श्रीकृष्णाची अनेक रुपे आहेत आज त्यांनी श्रावणाचे घेतलेले रुप नक्कीच प्रशंसनिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *