उलट तपासणीत वास्तव न्युज लाईव्हचे प्रश्न विचारले होते
नांदेड(प्रतिनिधी)-घरात नळाच्या कामावरुन झालेल्या वादानंतर आपली मोठी वहिणीला शिवीगाळ आणि तिच्या मुलाला मारून जखमी करणाऱ्या चुलत्यास व चुलत भावास मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड शहरातील वजिराबाद भागात राहणारे कुशल शिवप्रसाद तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 फेबु्रवारी 2021 रोजी त्यांच्या घरात नवीन नळ कनेक्शन लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी त्यांची आई त्या कामावर देखरेख करत होती. पण त्यावेळी त्यांचा चुलता शामसुंदर नारायण तोष्णीवाल आणि चुलतभाऊ यश शामसुंदर तोष्णीवाल तेथे आले आणि कुशलच्या आईला शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ का करता असा जाब कुशलने विचारला तेंव्हा त्यांचा चुलत भाऊ यश शामसुंदर तोष्णीवालने आपल्या हातातील कड्याने कुशलला मारहाण केली. त्यामुळे त्याचा ओठ चिरला, त्याला उपचार घेवून टाके लावून घ्यावे लागले होते. या संदर्भाने कुशलने दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी शामसुंदर तोष्णीवाल आणि त्यांचा मुलगा यश तोष्णीवाल विरुध्द गुन्हा क्रमांक 59/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी न्यायालयात दोघांविरुध्द दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाचा अंतिम निकाल 3 मार्च 2023 रोजी आला.
न्यायालयात या प्रकरणी झालेल्या साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध झालेला पुरावा या आधारावर न्यायाधीश जैन देसरडा यांनी शामसुंदर नारायण तोष्णीवाल आणि त्यांचा मुलगा यश शामसुंदर तोष्णीवाल या दोघांना प्रत्येक एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 34 नुसार ठोठावली. इतर कलमांमधुन या आरोपींची मुक्तता झाली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.श्रीमती एस.डी.जोहिरे यांनी मांडली आणि तोष्णीवाल पिता-पुत्र या आरोपींचा बचाव दुसऱ्या पिढीतील वकीली व्यवसाय करणारे ऍड.एम.आर.शर्मा (खांडील) यांनी मांडली होती.
या खटल्यातील प्रक्रिया सुरू असतांना उलट तपासणीमध्ये कायद्यासोबत खेळण्याची भाषा करणाऱ्या ऍड.एम.आर.शर्मा (खांडील) यांनी तोष्णीवाल कुटूंबाच्या भांडणादरम्यान वास्तव न्युज लाईव्हने दुसऱ्या घटनेच्या संदर्भाने लिहिलेल्या बातमीचे प्रश्न विचारले. सोबतच दुसऱ्या जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्रश्न विचारले. वास्तव न्युज लाईव्हने कोणत्या बातम्या छापाव्यात याची विचारणा आता ऍड.एम.आर.शर्माला करावी लागेल काय असा प्रश्न समोर आला. ऍड.मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) विरुध्द नांदेडला अ दखल पात्र गुन्हा दाखल झाल्याचे उत्तर एका साक्षीदाराने दिले होते अशा अनेक घटनांमुळे ही उलट तपासणी ऐकण्यासाठी त्यावेळी न्यायालयात अनेक वकील जमले होते. तरी पण मी कायद्याशी खेळतो असे भंपक वक्तव्य करणाऱ्या ऍड.एम.आर.शर्मा (खांडील) हे आपल्या आरोपींना मात्र शिक्षेपासून वाचवू शकले नाहीत.
ऍड.एम.आर.शर्माच्या दोन तोष्णीवाल आरोपींना न्यायालयाने ठोठावली शिक्षा