नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील फारुख नगर भागात तीन युवकांनी एका 23 वर्षीय युवकावर चाकूने अनेक वार करत रक्ताने धुळवड साजरी केली आहे.जखमी युवकावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतांना रक्ताचे थेंब उधळत धुळवड साजरी केल्याची घटना घडली आहे.अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फारुख नगर भागात दुपारी 3.45 ते 4 वाजेदरम्यान रस्त्यावर गणेश राजराम हिवराळे (23) या युवकावर तीन युवकांनी चाकूने हल्ला केला गणेशच्या मानेवर,पोटात दोन जागी पाठीत असे एकूण 7-8 वार करून ते तीन हल्लेखोर पळून गेले होते.तेथे रस्त्यावर रक्त सांडलेले दिसत होते.फारुख नगर भागात घटना पाहणाऱ्या काही लोकांनी सांगितले की गणेशवर हल्ला करणारा एक संतोष वाघमारे होता पण इतर दोघांची नावे तेथील नागरिकांना माहिती नाहीत.
घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस ठाणे विमानतळचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे आणि त्यांचे अनेक सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले होते.पोलिसांनीच जखमी गणेश हिवराळेला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले आहे.सध्या गणेशवर उपचार सुरु आहेत.