नांदेड(प्रतिनिधी)-पाकिस्तान -भारताची सिमा असलेल्या पंजाब राज्यातील वाघा बॉर्डर येथे राष्ट्रभक्तीसह गुरू भक्तीचे शब्द गुंजणार आहेत. यासाठी द.भ.प. श्री.साईनाथ महाराज बिनताळकर(वसमतकर) हे आपल्या जवळपास दीड हजार भक्तांसह गुडीपाड्याव्यापासून राष्ट्रभक्ती व गुरूभक्तीचे शब्द तेथे सांगणार आहेत.
अटारी, वाघा बॉर्डर येथे 22 मार्च गुडीपाड्याव्यापासून 28 मार्चपर्यंत राष्ट्रभक्ती आणि गुरूभक्ती, दत्तस्मरण या एकात्मिक विषयातून प्रबोधन घडविण्याची एक योजना माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमचे द.भ.प.श्री.साईनाथ महाराज बिनताळकर यांनी आखली आहे. याची माहिती सुध्दा महंतांनी पत्रकारांना दिली. वेगवेगळ्या कामासाठी नामस्मरण करण्याची प्रथा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीत आहे. परंतू देशासाठी नामस्मरण आजपर्यंत झालेले नाही आणि असा प्रयोग मी पहिल्यांदा करत आहे. माहुर, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, जालना, आंध्र-प्रदेश येथून जवळपास दीड हजार भक्तमंडळी या सप्ताहात सहभागी होणार आहेत.
आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहुरचे श्री.साईनाथ महाराज यांनी आपल्या जीवनात 2006 पासून आनंद दत्तधामचे प्रमुख म्हणून काम करणे सुरू केले. स्वच्छता अभियान, शिक्षण, महिला सक्ष्मीकरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन आणि जीवाचा उध्दार या सप्तसुत्रीवर ते काम करतात. त्यांनी कोरोना काळात केलेल्या समाजाच्या सेवेबद्दल त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार मिळाला आहे. अनेक दवाखान्यामध्ये ते रुग्णांच्या नातलगांना भोजन पुरवितात. आपल्या कामात अंधश्रध्देला बिलकुल स्थान नाही असे त्यांनी सांगितले. कोणत्याही धर्माबद्दल भेदभाव न बाळगता मी सर्व धर्मांचा आदर करतो हे सांगतांना त्यांनी दत्तनाम उच्चारण हे जगाच्या शांतीसाठी आवश्यक आहे असे सांगितले. याप्रसंगी बबनराव जगाडे, विश्र्वनाथ घोणकोट, विलास पाटील शिंदे, आनंद गंदीलवार आदी उपस्थित होते.
वाघा बॉर्डरवर दत्तधाम आश्रमचे श्री साईनाथ महाराज करणार राष्ट्रासाठी नामस्मरण सप्ताह