नांदेड (प्रतिनिधी)- यावर्षी मान्सुन उशीराने दाखल झाला.यामुळे पाऊसही जिल्ह्यात उशीरानेच दाखल झाला. तोही काही भागात मध्यम स्वरुपाचा तर काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत होता. मृगनक्षत्र पुर्णता: कोरडे गेले. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत येत असला तरी म्हणावी तशी पेरणी अद्यापही झाली नाही. एकंदरीत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 23.13 टक्के पेरणी पुर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी विभागाकडून देण्यात आली.
सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहे. जुलै महिना उजडला असून पेरण्या कधी करायच्या या चिंतेत शेतकरी सध्या अडकला आहे. आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे ठरवले असले तरी अद्यापही 100 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या नाहीत. जिल्ह्यामध्ये 7 लाख 66 हजार 809 हेक्टर ही जमीन पेरणीखाली येते. त्यापैकी दि.4 जुलै पर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार 397 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये 23.13 टक्के एवढीच पेरणी जिल्ह्यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक भोकर तालुक्यात 36 हजार 845 हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ माहुर तालुक्यात 23 हजार 48 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी 67.18 टक्के. त्यानंतर धर्माबाद तालुक्यात 20 हजार 687 हेक्टर पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी लोहा तालुक्यात केवळ 10 हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर नांदेड तालुक्यात 255 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
यामध्ये मुख्य पिकांपैकी सोयाबीन आणि कापुस या दोन पिकांची पेरणी सर्वाधिक झाली आहे. यात सोयाबीन 71 हजार 816 हेक्टर तर कापुस या पिकाची 89 हजार 762 हेक्टरवर पेरणी झाली आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात 23 टक्के पेरणी