
नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात अनेक जागी हुलकावणी दिली. परंतू महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने रौद्ररुप सुध्दा दाखवले. पावसाच्या रौद्ररुपाने नांदेड जिल्ह्यातील पाळा तालुका मुखेड परिसरात अडकेलेले 30 ते 35 शेतकरी गावकऱ्यांनी मेहनत करून बाहेर काढले.
जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात पावसाची सुरूवात होत असते. परंतू यंदा मात्र पावसाने नांदेड जिल्ह्यासह राज्यात आणि देशात बऱ्याच जागी हुलकावणी दिली. त्यामुळे पाण्याची अडचण तर झालीच झाली पण शेतकऱ्यांची कामे पण रखडली. परंतू भारतासह राज्यात आणि नांदेड जिल्ह्यात सुध्दा पावसाने अनेक जागी जोरदार हजेरी लावली. या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात पाळा ता.मुखेड या परिसरात शेतीच्या कामासाठी गेलेले 30 ते 35 शेतकरी पुरात अडकून पडले. या भागात नाल्यांना मोठा पुर आला होता. परंतू अडकलेल्या लोकांचा जिव धोक्यात आल्याचे पाहुन अनेक गावकऱ्यांनी त्यासाठी धावपळ केली. कारण अडकलेल्या लोकांमध्ये काही महिला सुध्दा होत्या. गावकऱ्यांनी एक जेसीबी बोलावून त्या जेसीबीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढले. या प्रकाराने अडकलेल्या शेतकऱ्यांचे नातलग आणि प्रशासन यांचा जिव भांड्यात पडला. दरम्यान या पावसामुळे आणि वीजेच्या कडकडाटाने बावन वाडी येथे वीज पडून एक म्हैस आणि उमरदरी येथे एक बैल दगावला आहे.
