नांदेड,(प्रतिनिधी)- आज सकाळी नावघाट येथील संत गणू पुलावरुन एक युवक आणि एक अल्पवयीन बालिका दोघांनी नदीपात्रात उडी मारली. पण तेथे हजर असलेल्या गोदावरी जीव रक्षक दलाने अत्यंत जलद प्रतिसाद देत त्यांचे प्राण वाचवले.काल 8 जुलै रोजी रात्री बालिकेला पळवल्याचा गुन्हा दाखल आहे.
आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास जुन्या नांदेड भागातील नावघाट पुलावरून एक युवक आणि एक बालिका मोटारसायकल क्रमांक MH 26 AH 6581 वर आले आणि त्यांनी आपली दुचाकी उभी करून थेट गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयंत्न केला. तेथे महानगर पालिकेने तैनात केलेले जीवरक्षक हजरच होते. जिवरक्षक दलाचे अध्यक्ष सय्यद नूर यांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद अशफाक,सय्यद शोएब,सय्यद उमर यांनी त्या युवक आणि बालिकेला नदीपात्रातून बाहेर काढले. गोदावरी जीव रक्षक दलातील सदस्यांनी दोन जणांचे प्राण वाचवून केलेली कामगिरी नक्कीच वाखाणण्या सारखी आहे.
काल रात्रीच या बालिकेला पळवून नेल्या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्या बाबत इतवाराचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी सांगितले की, या बाबत आम्ही जाब जबाब घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहोत.
