शेतकऱ्यांना पैसे कधी देणार?; दोन कारखाने विकून आलेले पैसे गेले कुठे?
नांदेड (प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे बॅंकांचे 265 कोटी रुपये कर्ज असल्याची बाब नुकतीच उघड झाल्याने सभासदांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. बॅंकेच्या कर्जशिवाय भाऊराव कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपी चे 104 कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याची माहिती उसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी देऊन हुतात्मा व शंकर वाघालवाडा हे कारखाने विकून आलेले पैसे कुठे गेले असा सवाल उपस्थित केला. कारखान्याच्या डोक्यावर एवढा कर्जाचा डोंगर असल्याचे कळल्याने संचालक मंडळामध्ये नंबर न लागलेल्या अनेकांनी बर झालं सुटलो म्हटत सुटकेचा निश्वास टाकला.
आमच्याकडे बक्षीस ठेवायला जागा कमी पडत आहे जिल्ह्यात आमच्याच साहेबांनी सहकार कसा जिवंत ठेवला अशी शेखी मिरवणाऱ्यांना कारखान्याचे आर्थिक वास्तव कळल्याने पळता भोई कमी होत आहे. कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्यासाठी शेअर्स धारकांना कर्ज द्यावे त्यासाठी कारखाना हमी घेईल अशा स्वरूपाची मागणी करताना सादर केलेल्या कारखान्याच्या आर्थिक विवरण पत्रात विविध बॅंकांचे कारखान्याकडे 265 कोटी रुपये कर्ज असल्याची बाब एका वृत्तपत्रातून समोर आली त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मुख्य प्रवर्तक असणाऱ्या कारखान्याच्या डोक्यावर कर्जाचा एवढा डोंगर असेल हितचिंतकाला वाटले नव्हते. बॅंकांची देणे हे तर एक झाकी आहे परंतु शेतकऱ्यांचे अद्याप 104 कोटी रुपये देणे बाकी आहेत त्याचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केला. कारखान्याच्या सभासदांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता ऊस एफ आर पी चे थकीत पैसे कधी देणार?भाऊराव चे दोन युनिट विकून आलेली रक्कम कुठे गेली? याचा जाब कारखान्याच्या मुख्य प्रवर्तकासह चेअरमन व संचालक मंडळाला विचारून वेळप्रसंगी रस्त्यावर येण्याची तयारी ही शेतकऱ्यांनी ठेवावी असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.