नांदेड (प्रतिनिधी)- शिवनगर, नांदेड येथे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 55 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच भोकर शहरात एक घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 8 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.
रत्नदीप राजाराम लोहार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलैच्या सकाळी 9 वाजेपासून ते 6 जुलै सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान शिवनगर येथील त्यांच्या घराचा कडीतोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 55 हजार रूपये रोख रक्कम, दुकानातील कॅश बॉक्समध्ये असलेले 3 हजार रूपये आणि एक एलईडी असा 1 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गौंड अधिक तपास करीत आहेत.
विजयकुमार गंगाधर तेलंगे यांचे घर सराफा कॉर्नर गांधी चौक भोकर येथे आहे. दि. 3 जुलैच्या दुपारी 3 ते 7 जुलैच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांनी आपल्या घराला कुलूप लाऊन मेव्हुनीकडे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरटयांनी त्यांचे घर फोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 8 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.