आम्ही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील बंडानंतर येथील निष्ठावान कार्यकर्ते पक्ष अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यासोबत असून येणार्‍या काळात नांदेडमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

जनसामान्यात पत गमावलेल्या भारतीय जनता पार्टीने ईडीने, सीबीआयच्या माध्यमातून फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही जणांनी पक्ष अध्यक्ष यांची साथ सोडून सत्ताधारी भाजपसोबत जाऊन मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे बोलाविलेल्या बैठकीसाठी नांदेड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री कमलकिशोर कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील आदी वरिष्ठ नेतेमंडळींची भेट घेऊन नांदेड येथील कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत, असा विश्‍वास देण्यात आला आहे. नांदेड शहरातही हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असून येणार्‍या काळातही कार्यकर्ते पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहतील, असा विश्‍वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शरद पवार यांनी सर्वच समाजातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजपकडून राज्यात जातीयवाद पसरविण्याचे काम सुरू आहे. मुस्लिम, दलित व ओबीसी समाजातील सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या पदावर संधी देण्यात आली. हे केवळ राष्ट्रवादी पक्षच करू शकतो. शरद पवारांच्या विचारातून कार्यकर्ते प्रेरित असून येणार्‍या काळात शरद पवार यांच्या विचारांवर पक्षाची जडणघडण होईल, त्यांच्यासोबत नांदेड येथील निष्ठावंत कार्यकर्ता असेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *