नांदेड (प्रतिनिधी)- एका व्यक्तीचा खून करून फरार असलेल्या आरोपीला नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद करून त्याला पुढील तपासासाठी मुखेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
दि. 22 जून रोजी कृष्णा भोसले या युवकाला घरातून उचलून नेऊन त्याचा खून करण्यात आला होता. याबाबतची तक्रार त्यांचे बंधू श्यामराम भोसले यांनी दिल्यानंतर मुखेड पोलिसांनी गुन्हा 193 दाखल केला. या गुन्ह्यात एकपेक्षा जास्त मारेकरी आहेत.
या प्रकरणातील एक मारेकरी पिंटू रामा भोसले हा शिवाजी चौक लोहा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तेथे गेले आणि पिंटू उर्फ छत्रपती रामा भोसले रा. लोहा जि. नांदेड यास ताब्यात घेतले. त्याने कृष्णा भोसलेचा खून केल्याची कबूली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला मुखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे, भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफाकत आमना आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, देवा चव्हाण, राजेश सिटीकर, दीपक ओढणे, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके आणि शंकर केंद्रे यांचे कौतुक केले आहे.