देगलूर पोलीस ठाण्याच्या सन 2021 च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात सन 2021 च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या देगलूर पोलीस ठाण्याला मिळालेले बक्षीस आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानंतर सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्विकारले.
पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट काम करण्याची स्पर्धा लागावी म्हणून केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाने सुध्दा सन 2021 पासून सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अशी निकोप स्पर्धा आयोजित केली. यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा आला. द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याने मिळवला. तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीनगर शहर येथील वाळूज पोलीस ठाण्याला मिळाला.चतुर्थ क्रमांक अर्जुनी मोर पोलीस ठाणे जिल्हा गोंदिया यांनी पटकावला. तर पाचवा क्रमांक राबोडी पोलीस ठाणे ठाणे शहर यांना प्राप्त झाला. या स्पर्धेचा निकाल 4 जुलै रोजी अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी जाहीर केला होता.
या प्रसंगाला अनुसरून नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने देगलूर पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये कार्यरत पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी हा सन्मान आज दि.10 जुलै रोजी पोलीस महासंचालक कार्यालयात स्विकारला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांच्यासह राज्यभरातील असंख्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थितीत होते. आपल्या जिवनात केलेल्या चांगल्या कामाचा परिणाम सेवानिवृत्तीनंतर सुध्दा उत्कृष्ट रित्या प्राप्त होतो हे भगवान धबडगे यांनी स्विकारलेल्या सन्मानानंतर स्पष्ट झाले आहे.
