आपल्याला आवडतील ती कामे आपल्याला भेटतीलच असे नसते. अशा परिस्थितीत मिळालेल्या कामांमध्ये आपली आवड निर्माण करून त्याच्यासाठी आपल्यावतीने शंभर टक्के मेहनत घ्यायची असते. सोबतच आपण पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरीता जीवनात जीवन शोधायचे असते, हेच काम करत नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी माझं गडप्रेम हे पुस्तक लिहिलं. इतिहासाचे अनेक अभिलेख आहेत, गडांचे अनेक अभिलेख आहेत. सुरज गुरव यांनी लिहिलेले माझं गडप्रेम पुस्तक वाचताना आपण जणू त्या गडांतच फिरत आहोत, असे वाटते. पोलीस विभागात काम करताना सुरज गुरव यांनी लेखणी सुद्धा वापरली आणि त्या लेखणीचा त्यांनी केलेला उपयोग अनंत काळापर्यंत नक्कीच लोकांच्या लक्षात राहील अशा स्वरूपाचे हे पुस्तक आहे, माझं गडप्रेम.
वाचकांसाठी या पुस्तकाचे परीक्षण लिहिताना प्रत्येक वाचकाला याची नक्कीच कल्पना येईल की, माझे स्वत:चे ज्ञान किती कमी आहे. या पुस्तकात इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे यांनी श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा मुळ फोटो 1919 मध्ये शोधल्याचा उल्लेख आहे. बाजीप्रभू देशपांडेंनी तोफे आधी मरेन बाजी… ही शब्दरचना सुद्धा आम्हाला माहित नव्हती. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा उल्लेख होतो, तेव्हा या पुस्तकातून कळते की, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 55 गड आहेत. इतर गडांची संख्या पुढील प्रमाणे. रायगड – 43, पुणे – 30, सातारा – 24, सांगवी – 12, कोल्हापूर – 13, सोलापूर – 9, उस्मानाबाद/धाराशिव – 2, लातूर – 2, बीड – 2, नांदेड 2, परभणी – 2, औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर – 10, अहमदनगर – 18, नाशिक – 55, जळगाव – 8, धुळे – 5, नंदूरबार – 5, ठाणे – 14, रत्नागिरी – 20, सिंधुदूर्ग – 22, चंद्रपूर – 4, गडचिरोली – 3, भंडारा – 1, नागपूर – 6, वर्धा – 3, अमरावती – 3, यवतमाळ – 2, अकोला – 4, बुलढाणा – 6, कांरजालाड – 1 असे आहेत. सुरज गुरव यांच्या पुस्तकात नांदेडच्या नंदगीरीचा उल्लेख नाही, जो त्यांनी 8 जुलै 2023 रोजी पाहिला.
माझं गडप्रेम हे पुस्तक प्रथम आवृत्ती एप्रिल 2023 मध्ये प्रसिद्ध झाली. लगेच दुसऱ्या महिन्यात मे 2023 मध्ये दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. यावरून या पुस्तकाबद्दलची आवड वाचकांमध्ये दिसते. या पुस्तकाच्या प्रकाशक संस्कृती गुरव ह्या आहेत. बायोफोकस पब्लिकेशन स.न. 6/10 राजयोग फेज 2-बी, अंबेगाव बु. हवेली, जि. पूणे – 411046 येथे हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ गणेश पोतदार यांनी तयार केले आहे. या मुखपृष्ठावर हात फिरवला तर शब्दांवर आणि गडांवर हात फिरवत आहोत, असे सुंदर रेखाठण करण्यात आले आहे. पुस्तकात वेगवेगळ्या गडांचे नकाशे रेखाटण स्वत: सुरज गुरव, प्रथमेश राजे आणि निकीत करांडे यांनी केले आहे. या पुस्तकाची मांडणी युनायटेड मल्टीकलर प्रिंटर्स प्रा.लि. शनिवारपेठ पुणे यांनी केले आहे. संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक 9955835858 देण्यात आला आहे. या पुस्तकाची किंमत 599 रूपये आहे.
जगणं सुसह्य आणि आनंदी करणाऱ्या जगातील सुंदर मित्रत्वाच्या नात्याला माझं पहिल पुस्तक अपर्ण करताना सुरज गुरव यांनी आपल्या जीवनातील आपल्या मित्रांचे स्थान किती मोठे आहे, हे दाखविले आहे. या पुस्तकाची प्रास्तावना छत्रपती संभाजी राजांनी लिहिली आहे. ज्यामध्ये छत्रपतींच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरज गुरव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना मा. रणजित देसाई यांची श्रीमान योगी या ग्रंथाने मला गंडांबद्दल वेड लागले, पण आपल्या शिक्षणानंतर मी पोलीस विभागात आलो आणि वेळेची मारामार होऊ लागली. तरी पण मला लागलेले ते वेड पूर्ण करण्यासाठी भरपूर काही मेहनत घ्यावी लागली. त्यात त्यांच्या मित्रांनी दिलेली साथ उल्लेखीत केली आहे. त्यांची पत्नी संस्कृती यांनी सुद्धा सुरज गुरव यांना दिलेल्या पाठबळावर त्यांनी आपल्या किल्ल्यांचे वेड पूर्ण केलेले दिसते. पुस्तकात एका पानावर राजघराण्याची वंशावळ दाखविली आहे.त्यानंतर पेशवाईचा काळ सुद्धा वंशावळीसारखा दाखविला आहे. ज्यामुळे आपल्याला भरपूर माहिती मिळते.
वेगवेगळ्या गडांवर असणारे शरबशिल्प, गंडभेरूड, व्याल, किर्तीमुख, गणेशशिल्प आणि हनुमान यांची शिल्पे असतात आणि त्याचे वर्णन या पुस्तकात आहे. यात गंडभेरूड हा एक काल्पनिक पक्षी आहे. ज्याला दोन तोंडे आहेत. त्याचा उल्लेख करताना त्याची कारण सांगितले आहेत. गंडभेरूड त्या काळात काल्पनिक पक्षी होता, परंतु आजच्या जिवनात प्रत्येक व्यक्तीच्या आसपास अनेक गंडभेरूड आहेत, ज्यांच्यामुळे जीवनाची वाट लागते. परंतु मुळ गंडभेरूड काय हे समजण्यासाठी माझं गडप्रेम हे पुस्तक वाचावेच लागेल. आजच्या जीवनात प्रत्येकाच्या आसपास वावरणाऱ्या या गंडभेरूडांमुळे जीवनात होणारे त्रास दूर करताना नागरिकांना अनंत त्रास होतात. या गंडभेरूडांना दुरूस्त करण्यासाठी सुरज गुरव यांनी मेहनत करून पोलीस उपअधीक्षक पद मिळवले आहे. पुढे ते विशेष पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत जातील, म्हणून असे नक्कीच सादरीकरण आहे की, या गंडभेरूडांच्या बंदोबस्तासाठी सुद्धा आपण नक्कीच पुढाकार घ्यावा.

पुस्तकातील अनुक्रमणिकेपर्यंत 40 गड-किल्ल्यांचा देखावा शब्दांचा माध्यमातून सुरज गुरव यांनी तयार केला आहे. राजगड असेल, रायगड असेल या ठिकाणचे सुरज गुरव यांनी लिहिलेले वर्णन वाचताना आपल्याला असे वाटते की, आपण स्वत:च गडांवर फिरत आहोत. या गडांचा इतिहास सुरज गुरव यांनी लिहिला आहे. त्या गडांवर काय घडले होते, त्याचे परिणाम स्वराज्यवर कसे झाले, छत्रपती राजांना त्रास कसा झाला, त्या त्रासातून त्यांनी कसे मार्ग काढले. हे लिहिताना प्रत्येक गडाची भुमिका अनुक्रमणिकेत लिहिली आहे. पुरंदर हा गड स्वराज्य उभारणीतला आधारस्तंभ आहे. राजगड हा पहिल्या राजधानीचा मान असणारा किल्ला आहे. रायगड हा गडांचा गडपती आहे. जिंजी संकटात स्वराज्याची रक्षण करण्याची भुमिका निभावणारा किल्ला आहे. अजिंक्य तारा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पन्हाळा गडावर छत्रपतींच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंग घडले आहे. विशाळगड वीर बाजीप्रभू देशपांडे यांना कुशीत सामावून घेणारा अजस्त्र किल्ला आहे. रांगणा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेवर रखवाली करणारा किल्ला आहे. सामानगड वैशिष्टयपूर्ण विहिरी असणारा किल्ला आहे. प्रचितगड कोकणावर लक्ष ठेवतो. प्रतापगड छत्रपतींच्या प्रतापांना अनुभवणारा किल्ला आहे. सदाशिवगड घाट वाटांना सरंक्षण देणारा किल्ला आहे. वसंतगड ऐतिहासिक प्रवासाचा साक्षीदार किल्ला आहे. दातेगड आगळीवेगळी ओळख जपणारा किल्ला आहे. वैराटगड विराट व उंच असणारा किल्ला आहे. वासोटा घनदाट जंगलाचा कुशीत लपलेला किल्ला. रोहिडा स्वराज्य निर्मितीचा डाव प्रत्यक्ष अनुभवणारा किल्ला. मल्हारगड इतिहासाच्या मानाने सर्वात तरूण किल्ला. लोहगड सर्पाकार प्रवेश द्वारासाठी प्रसिद्ध असणारा किल्ला. तोरणा आभाळा टेकलेला किल्ला. दौलतमंगळ प्राचीन मंदिराचा रक्षणकर्ता किल्ला. शिवनेरी प्रतापी छत्रपती राजांचा जन्मस्थान असणारा किल्ला. सिंहगड तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पावन झालेला किल्ला. संग्रामदुर्ग पराक्रमी परंपरेतील दुर्लक्षीत किल्ला. सुधागड विस्तृत पठारांचा राजधानीच्या तोला-मोलाचा भलामोठा किल्ला. सरसगड आगळ्यावेगळ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला. लिंगाणा उंच व धोकादायक व धडकी भरविणारा किल्ला. नळदुर्ग मराठवाड्याचे भूषण आणि बलशाही भुईकोट किल्ला. गोपाळगड प्राचीन जलमार्गांवरील ठाणेदार तरीही दुर्लक्षीत किल्ला. गोवळकोट वशिष्टीखाडीकर वसलेला किल्ला. सुवर्णदुर्ग दुलर्क्षीत, उपेक्षीत तरीही सामर्थशाली किल्ला. विजयदुर्ग आरमारी सामर्थ्यांचा प्रतिक. जंजिरा अंजिक्य, अभेद आणि पोलादी किल्ला. सिंधुदूर्ग शिवरायांची शिवलंका व मराठ्यांचा जंजिरा. वेल्लोर स्वराज्याच्या दूरदेशी प्रांतातील संकटमोचक किल्ला. उदगीर मराठवाड्याला आधारस्तंभ. कंधार राष्ट्रकुटापासून स्वतंत्र अस्तित्व जपणारा किल्ला. देवगिरी दिल्ली सत्ताधीशांचे आक्रमण थोपवणारा दक्षिणेतील पहिल्ला किल्ला. अनुक्रमणिकेप्रमाणे 40 गडांचा उल्लेख या पुस्तकांत असला तरी सुरज गुरव यांनी 210 किल्ल्यांवर भ्रमण केले आहे. याची माहिती त्यांचे मित्र भगवान चवले या एवरेस्टवीराने लिहिले आहे.
यासोबतच बिदरशाही, अहमदनगरची निजामशाही, सुवर्णहोन आणि शिवराई या मुद्रांबाबत या पुस्तकात उल्लेख आहे. कर्नाटकच्या बादामीच्या चालुक्य राज्याबद्दल सुद्धा या पुस्तकात लिखाण आहे. शिवकालीन बारा विशेष महालांची माहिती या पुस्तकात आहे. किल्ल्यावरील कोणत्या भागाला काय म्हणतात याचा उल्लेख या पुस्तकात आहे. शिवकालीन 18 कारखाने कोणते होते, याचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. विजयनगराच्या साम्राज्याबद्दल या पुस्तकात उल्लेख आहे. 7 वाहन राजवट सुरज गुरव यांनी उल्लेखीत केली आहे. खिलजी घराण्याचा उल्लेख स्वराज्याची कसा जोडला गेला, याचा उल्लेख या पुस्तकाशी आहे. वीरगळ या शिळांबद्दलचा सविस्तर उल्लेख या पुस्तकात आहे. काही गडांवरून चालताना समुद्रातून दिसणाऱ्या प्रसंगाचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक लिहिताना सुरज गुरव यांनी जवळपास 40 संदर्भ ग्रंथ वाचलेले आहेत आणि त्या आधारावर या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
गडांवर असणाऱ्या कोट, बुरूज, तटबंदी, चिलखती बुरूज, माची, बालेकिल्ला, मेट, घेरा, जिभी, महादरवाजा, दिंडीदरवाजा, चोरदिंडी, देवडी, चौक्या, गस्ती, नगारखाना, अडसर, अणुकूचीदार खिळे, फांजी, सोपानमार्ग, चर्या, जंग्या, नाळ, भुयार, नेड, चुन्याचा घाणा, टाकं, सदर, राजवाडा, ढोलकाठी, अंबरखाना, दारूकोटा, टाकंसाळ, शौचकुपी, अंधारकोठडी, पागा, जोते/चौथरा, समाधी, खंदक या शब्दांना विस्तृत करून लिहिले आहे, जेणे करून किल्ला पाहणाऱ्यांना काही अडचण येणार नाही.
सुरज गुरव यांनी जसा आरसा गप्प राहून सुद्धा आपला निर्णय देण्याची क्षमता ठेवतो. त्याप्रमाणे या पुस्तकातील शब्दांना अशा प्रकारे आलेखीत केले आहे की, आम्ही किंवा वाचक कधी गडावर गेलेच तर त्यांना कोणत्या गावाहून कोणत्या गावापर्यंत जायचे आहे, तेथून गडावर कसे चढायचे, पहिल्यांदा कोणता भाग पाहायचा अशा अनुक्रमणाप्रमाणे गडाचा शेवट कसा येईल, यासाठी सुंदर आणि उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. कोणत्या ठिकाणी काय समस्या आहे, त्यासाठी काय आधार लागेल, जेवणाची सोय कोठे आहे, याचाही उल्लेख या पुस्तकात केल्यामुळे आम्हाला सुरज गुरव यांनी वर्णीत केलेल्या गडावर जाताना कोणत्याही प्रकारची गाईडची गरज लागणार नाही. म्हणूनच तुमच्याकडे आमच्यासारखे भरपूर असतील, परंतु आमच्याकडे आणि समाजाकडे तुमच्यासारखा नक्कीच कोणी नाही सुरजजी. या शब्दासह विनंती अशी की, आमच्या लिखाणात काही कमतरता राहिल्या असतील तर आम्ही एक हिंदी कवीचे वाक्य उल्लेखीत करू इच्छितो, ” शौक से निकालिए कमीयां मेरे किरदार में, आप नहीं होंगे तो मुझे तराशेगा कौन’ आम्ही केेलेल्या लिखणीच्या प्रयत्नांना वाचकांनी पुस्तक खरेदी करून प्रतिसाद दिला तर आम्ही केलेले हे प्रयत्न करतब ठरतील, नाहीतर हा वाचकांनी आमच्या हातून घडलेला अपघता समजावा.
पुस्तक परीक्षण
– कंथक सुर्यतळ