नांदेड (प्रतिनिधी)- घरात आईस्क्रीम पार्लर चालविताना झालेल्या भांडणानंतर मारहाण झाली, डोके फुटले तरी पण 13 जणांविरूद्ध जीवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पकडलेल्या चार जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देेसरडा यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि. 10 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कांतीलाल विष्णुप्रसाद शर्मा यांच्या घरात सुरू असणाऱ्या आईस्क्रीम पार्लर या दुकानात काही जण आले आणि गोंधळ घालू लागले. एकाच ठिकाणी आईस्क्रीम, कुल्फीची दुकान आणि घर आहे. भांडण झाल्यानंतर काही जणांना बोलावून एका युवकाने कांतीलाल शर्मा त्यांचा चेतन शर्मा, भाऊ प्रेमराज शर्मा आणि पुतण्या पुष्पक यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी काही जणांना तेथे लोकांनीच पकडले. या प्रकरणी कांतीलाल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनेश मेटकर, होलापिराजी मेटकर, दिपक चांदू गाडे, राहुल पिंटू बाभुळकर, सुनील चिमणाजी वाघमारे, लिंबाजी मेटकर, गोविंद मेटकर, दिलीप मरीबा मेटकर, रणजित गोविंद मेठकर, साहेबराव लिंगू मेटकर, पिराजी पापा मेटकर, लिंगू बालाजी साखळीकर, आकाश मरीबा मेटकर अशा 13 जणांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 323, 147, 148, 149 आणि 135 प्रमाणे गुन्हा क्र. 474/2023 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. मुत्त्येपोड यांच्याकडे देण्यात आला.
जनतेने पकडलेल्या सुनील चिमणाजी वाघमारे (20), राहुल पिंटू बाभळीकर (19), भोला पिराजी मेटकर (20), दीपक चांदू गाडे (19) या चार जणांना अटक झाली. आर.एस. मुत्त्येपोड आणि त्यांच्या सहकारी अंमलदारांनी पकडलेल्या चार जणांना न्यायालयात हजर केले. युक्तीवाद ऐकून मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी चार जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.