नांदेड (प्रतिनिधी)- रात्रीची गस्त करताना स्मार्ट फोनचा वेड लागलेली एक 14 वर्षीय बालिका दामिनी पथकाला एकटी फिरताना भेटली. ती मुलगी त्यांनी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिचे समुपदेशन करून प्रभारी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासमक्ष ती मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन केली.
काल दि. 10 जुलैच्या रात्री 8 वाजेपासून 11 जुलैच्या पहाटे 5 वाजेपर्यंत वजिराबाद पोलीस ठाण्याच्या ड्युटी ऑफिसर प्रविण आगलावे हे होते. दामिनी पथकातील पोलीस अंमलदार बुरकुले यांनी एक 14 वर्षांची बालिका पोलीस ठाण्यात आणली. अत्यंत सुस्वरूप ही बालिका काहीच सांगत नव्हती. जे काही विचारले त्याबद्दल ती खोटे बोलत आहे, असे पोलिसांनी मत झाले. यावेळी महिला पोलीस अंमलदार आशा नरळे आणि मिनाक्षी हासरगोंडे यांनी त्या बालिकेला विचारणा केली तेव्हा मला स्मार्ट फोन आवडतो पण आई-वडिला त्याचा वापर करू देत नाही, म्हणून मी रात्री घरून एकटीच निघाले आणि उगचीच फिरत होती. देवाच्या कृपेने ही बालिका समाजातील गुन्हेगारांच्या नजरेला पडली नाही. ती पोलिसांच्या नजरेला पडली आणि पोलिसांनी तिला वजिराबाद पोलीस ठाण्यात आणले. सर्व पोलिसांनी मिळून तिची इंत्यभूत माहिती काढली,त्यावरून ही बालिका अत्यंत हुशार असून फक्त स्मार्टफोन मिळाला नाही, म्हणून मध्यरात्री 12 वाजता घरातून बाहेर पडली आणि सुदैवाने पोलिसांना सापडली. पोलिसांनी ही सर्व माहिती आपले वरिष्ठ अधिकारी प्रभारी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांना सांगितली आणि नंतर पोलिसांनी बालिकेच्या आई-वडिलांना बोलावून ती बालिका सुखरूप त्यांच्या स्वाधीन केली.
स्मार्ट फोनचा हा समोर आलेला परिणाम किती भयंकर आहे, याची कल्पनाच न केलेली बरी. समाजातील गुन्हेगारांच्या नजरेला ती मुलगी पायी चालताना पडली असती तर त्या बालिकेच्या त्यांनी काय केले असे ही लिहिण्याची गरज नाही. बालकांना आई-वडिलांनी समुपदेशन करून स्मार्टफोन जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट कसा आहे, हे सांगून सांगण्याची गरज आहे. आज ही बालिका पुन्हा सुखरूप आपल्या घरी पोहचली, पण ज्या बालिका आपल्या घरी पोहचू शकत नाही, त्यांचे काय? ही लिहीण्याइतपत ताकद आमच्याही लेखणीत नाही.