खा.असदोद्दीन ओवेसी यांना 500 रुपये दंड लावून अटक वॉरंट रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय नांदेडमध्ये सभा घेणाऱ्या एमआयएम प्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी यांनी आज तब्बल 13 वर्षानंतर नांदेड न्यायालयात अटक वॉरंट निघाल्यानंतर हजेरी लावली. एकूण 9 आरोपींपैकी आज 7 जण हजर होते. त्यापैकी खा.असदोद्दीन ओवेसी आणि दुसरा एक अशा दोघांना 500 रुपये दंड लावून न्यायाधीश पी.एस.जाधव यांनी त्यांना सुनावणीची पुढील तारीख दिली आहे.
महानगरपालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रकाश माधवराव येवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महानगरपालिकेची परवानगी न घेता एमआयएम पक्षाने देगलूर नाका परिसरात 26 ऑक्टोबर 2010 रोजी सभा घेतली होती. त्यावेळी सभेचे आयोजक शेख अफसर शेख बाबु, अब्दुल वाहब अब्दुल रजाक, अब्दुल नदीम, मोहम्मद शब्बीर, सय्यद मोईन सय्यद मुक्तार, आमदार महंमद सिद्दीकी, आ.शेख आफसर भैसा नगरपालिकेचे अध्यक्ष जाबेर अहेमद आणि एमआयएम प्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी आणि मरण पावलेले मोहम्मद सानी उर्फ नवाब नरसरुल्ला अशा 9 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक70/2010 दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण पोलीसांनी पुढे दोषारोप करून न्यायालयात पाठविले.
न्यायालयात या प्रकरणी तो खटला क्रमांक 532/2011 प्रमाणे सुरू झाला. परंतू अनेक जण या खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हते म्हणून खा.असदोद्दीन ओवेसीसह दोन जणांविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. आज या प्रकरणाची तारीख नसतांना सुध्दा वकील मंडळींनी हे प्रकरण आजच्या तारखेत घेण्यास लावले आणि त्यानंतर खा.असदोद्दीन ओवेसी यांची हजेरी न्यायालयाने काढलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आणि पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली.
न्यायालयात गर्दी असतेच आणि या गर्दीत खा.असदोद्दीन ओवेसी यांना काही त्रास होवू नये म्हणून प्रभारी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीसांनी चोख बंदोबस्त लावला.
भारतीय मुस्लीमांची ओळख संपवण्याचा प्रकार
न्यायालयातील आपले काम काम संपल्यानंतर खा.असदोद्दीन ओवेसी पत्रकारांशी बोलतांना समान नागरीक कायद्याविषयी म्हणाले की, हा प्रकार म्हणजे भारतातील मुस्लीमांची ओळख संपविण्याचा प्रकार आहे.हा खेळ भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचा आहे.समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर हिंदु समाजाला असणाऱ्या अनेक सुविधा संपतील असे ओवेसी म्हणाले.
हा लव्ह जिहाद नाही काय?
पाकिस्तानमधून आपल्या तीन लेकरांसह भारतात आलेल्या एका महिलेने आपला धर्म परिवर्तन करून हिंदु व्यक्तीशी केलेल्या लग्नाबद्दल विचारले असता ओवेसी यांनी मला याबद्दल अगोदर काहीच माहित नाही असे सांगत पत्रकारांच्या मुखारबिंदातून सर्व काही जाणून घेतले आणि पत्रकारांनाच प्रश्न विचारला की तुम्ही सांगताय तो सर्व घटनाक्रम लव्ह जिहाद नाही काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *