नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात 34 चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका चोरट्याला नांदेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नांदेड ग्रामीण येथील एका गुन्ह्यात 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आज नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे, पोलीस अंमलदार सुरेश कांबळे, प्रकाश सुकंमवार, रवि शंकुरवार, रामकिशन मोरे आदींनी राशीद शाह उर्फ तलवारसिंग हमीद शाह (47) रा. नायगाव महेबुबीया मस्जीदजवळ पोलीस ठाणे आकोट अंतर्गत यास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका चोरी प्रकरणात अटक केले. आणि आज न्यायालयात हजर केले.त्या चोरी प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. परंतू अत्यंत व्यावसायीक असलेल्या या चोरट्याने त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी नसल्याचा आव त्याने आणला आहे. या शातिर चोराने वर्धा, अमरावती, अकोला, नागपूर, पुणे, खामगाव, बुलढाणा,शेगाव, चंद्रपुर अशा ठिकाणी एकूण 34 चोऱ्या केल्या आहेत. हा चोरटा अकोला तुरूंगात असल्याची माहिती मे 2023 मध्ये नांदेड ग्रामीण पोलीसांना प्राप्त झाली होती. परंतू तेंव्हाच्या अधिकाऱ्यांनी त्याला नांदेडला आणण्यात काहीच रस घेतला नाही. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी नांदेड ग्रामीणचा कारभार स्विकारल्यानंतर या चोरट्यांना नांदेडला आणले आहे आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे.