नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पोर्चमध्ये काल दि.12 जुलै रोजी सायंकाळी एक महिला पोलीस अंमलदार आणि एक कनिष्ठ लिपीक यांच्यात हाणामारी झाली. महिला पोलीस ठाणे वजिराबाद येथे आली होती. वजिराबाद पोलीसांनी तिला दवाखान्यात उपचार करण्यासाठी पत्र दिले होते. मात्र ती परत आली नाही. यापुढे मात्र कोणीच काही सांगायला तयार नाही.
काल सायंकाळी कार्यालयाचा शेवटचा वेळ असतांना पोलीस अधिक्षक कार्यालयातून एक कनिष्ठ लिपीक बाहेर आले आणि तेथे त्यांच्यासोबत एका महिले पोलीस अंमलदाराची काही तरी कारणावरुन हमरीतुमरी झाली. काही जण सांगतात महिलेने पुरूषाला चोप दिला काही जण सांगतात पुरूषाने महिलेला चोप दिला. घडले काही असेल तरी प्रकार हा दुर्देवी आहे.
ज्या पोलीस विभागावर जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यातीलच एका महिला सहकारी अंमलदाराने पोलीसांच्या जीवनाचा हिशोब ठेवणाऱ्या कनिष्ठ लिपीकासोबत असा प्रकार घडेपर्यंत मजल मारली ही काही चांगली बाब नाही. घटना घडल्यानंतर महिला वजिराबाद पोलीस ठाण्यात आली होती. त्या महिलेला दवाखान्यात उपचार करण्यासाठी वजिराबाद पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराने पत्र दिले होते परंतू आज वृत्तलिहिपर्यंत ती महिला उपचार घेवून परत पोलीस ठाण्यात आलीच नाही अशी माहिती सांगण्यात आली आणि सर्वांनीच कानावर हात ठेवले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला पोलीस अंमलदार व कनिष्ठ लिपीकाची हाणामारी