प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने खाजगी बस तपासणी मोहिमेत 92 वाहनांवर कारवाई

खाजगी बस तपासणी मोहिमेत 2 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल

नांदेड (जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने खाजगी बस तपासणी मोहिम सुरु आहे. या तपासणी दरम्यान आतापर्यत 92 वाहनांवर कारवाई करुन 2 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरी सर्व खासगी बस चालक/मालक यांनी मोटार वाहन कायदा 1988 व 2019 तसेच नियमानुसार आपल्या बसेसची सर्व अटी व शर्ती नुसार पूर्तता करुन प्रवासी वाहतुक करावी. अटी व शर्तीचा भंग करणाऱ्या बसेसवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, यांची नोंद खासगी बस चालक/मालक यांनी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

 

सर्व खाजगीबस चालक / मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावे. वाहनांचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. या मोहिमेत विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक, रिफलेक्टर, इंडीकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी बाबींची तपासणी वाहनामध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, जादा भाडे आकारणे, अग्निक्षमन यंत्रणा कार्यरत असणे इ. बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच खाजगी बस मालकांनी दिलेल्या वेगमर्यादेत वाहन चालविण्यास चालकांना निर्देश द्यावेत. तसेच बस चालकांनी नशा करुन वाहन चालवू नये, अन्यथा मोटार कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच त्या चालकास पुढे जाऊ दिले जाणार नाही, पर्यायी चालकांची व्यवस्था बस मालकांनी करावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *