नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त एस.टी.वाहकाने 16 हजार 82 रुपये रोख रक्कम आणि ईटीआयएम मशीन आणि शिल्लक तिकिटांचे पुस्तक असा एकूण 53 हजार 558 रुपयांचा अपहार केल्यानंतर ते पैसे भरले सुध्दा पण न्यायालयात दाखल झालेल्या त्या खटल्यामध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी अपहार करणाऱ्या सेवानिवृत्त वाहकाला 6 महिने साधा कारावास व 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड बसस्थानक प्रमुख नरसींग श्रीरंग निम्मनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑक्टोबर 2016 रोजी नांदेड ते मुंबई जाणारी बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.3571 परत घेवून आल्यानंतर त्या गाडीचा वाहक विकास गणपत हटकर (58) याने तिकिट काढलेली रोख रक्कम 16 हजार 82 रुपये, ईटीएम मशीन 10 हजार रुपयांची आणि शिल्लक राहिलेले तिकिट पुस्तक 27 हजार 446 रुपयांचे कार्यालयात जमा न करता स्वत:कडेच ठेवून घेवून एकूण 53 हजार 528 रुपयांचा अपहार केला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 409 नुसार गुन्हा क्रमांक 166/2016 दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत भराटे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयातील प्रकरण क्रमांक आरसीसी 141/2017 मध्ये एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सेवानिवृत्त वाहक विलास गणपत हटकर याने अपहार केलेले पैसे बस डेम्पोमध्ये जमा केले होते. तरीपण आज 6 वर्षानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी अपहार करणाऱ्या वाहकास 6 महिने साधा कारावास व 500 रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली. दंड न भरल्यास 15 दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.सिमा जोहिरे यांनी बाजू मांडली. वजिराबादचे पोलीस अंमलदार बालाजी लांबतुरे आणि मिरा बच्छेवार यांनी पैरवी अधिकाऱ्यांची भुमिका पुर्ण केली.
अपहार करणाऱ्या सेवानिवृत्त वाहकाला साधा कारावास व रोख दंड