नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड येथील मकोका प्रकरणात आज तिसऱ्या गुन्हेगाराला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.25 जानेवारी रोजी मुदखेड-भोकर रस्त्यावर मेंडका येथील कॅनॉलजवळ रोख रक्कम, मोबाईल असा 1 लाख 48 हजार 571 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणात सुरूवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 395 सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला. पुढे या गुन्ह्यात मकोका कायद्याची वाढ झाली. त् यामुळे या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी अगोदर आकाश दिगंबर वाघमारे (27) रा.नुरी चौक ह.मु.पुणे आणि सुरज उर्फ सुऱ्या शंकर सोनटक्के (22) रा.करखेली ता.धर्माबाद या दोघांना अटक केली होती. काल स्थानिक गुन्हा शाखेने अजय शामराव राठोड (26) रा.वरदडा तांडा ता.मुदखेड यास पकडले.
आज सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन, सहाय्यक पोलीस निरिक्षक दशरथ तलतवार, पोलीस अंमलदार शेख जावेद, अविनाश पांचाळ, शेख फय्याज, अजय साकळे आदींनी अजय राठोडला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता एड.रणजीत देशमुख यांनी केलेला युक्तीवाद मान्य करत न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी अजय राठोडला चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.