नांदेड(प्रतिनिधी)-बाफना टी पॉईंट येथील अनेक एकर जमीनीवर भुमाफियांनी आपला ताबा असल्याचा बोर्ड लावला. त्यानंतर उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 7345/2023 दाखल झाला. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर आज नव्याने सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या समक्ष ही सर्व जमीन गुरूद्वारा बोर्डाची आहे, बोर्ड त्या जमीनीचा पट्टेदार आहे. म्हणून गट क्रमांक 86 आणि 96 मध्ये चुकीच्या पध्दतीने नोंदविलेली सर्व नावे रद्द करून गुरूद्वारा बोर्डाचे नाव या संपत्तीच्या कागदपत्रांमध्ये पट्टेदार म्हणून नोंदवावे असा अर्ज सादर केला आहे.
वेगवेगळ्या माफियांमध्ये भुमाफिया हा प्रकार सुध्दा समाजामध्ये रुढ झालेला अत्यंत घातक प्रकार आहे. या संदर्भाने प्राप्त झालेल्या अर्जानुसार गट क्रमांक 86 मध्ये 23 एकर 29 आर जमीन आहे. तसेच गट क्रमांक 92 मध्ये 23 एकर 38 आर जमीन आहे. सरदार मनजितसिंघ यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, ही जमीन सरकारची आहे आणि ती जमीन पट्टा या सदराखाली गुरूद्वारा बोर्डाला शासनाने दिलेली आहे. त्यानंतर 1978 ते 1992 दरम्यान वेगवेगळ्या व्यक्तीगत लोकांची नावे या गट क्रमांकातील 7/12 वर येत गेली. ही जमीन गुरूद्वारा बोर्डाने काही खाजगी लोकांना यासाठी दिली होती की, त्यांनी ती जमीन वहिती करावी. पण हळूहळू या जमीनीचा वाणिज्य उपयोग सुरू झाला.
महाराष्ट्रात कमी मेहनतीत आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याची चढाओढ लागलेली आहे. या चढाओढीतून बाफना टी पॉईंटच्या जवळपास 46 एकरपेक्षा जास्त जमीनीवर भुमाफियांची नजर पडली आणि त्यांनी त्यात आपला हात घुसवला आणि त्या जागी चारही बाजूने निळ्या रंगाचे पत्रे मारुन ही जागा दिपलक्ष्मी डेव्हलपर्स यांच्या ताब्यात सब लिजडिड आधारे ती सुध्दा नोंदणीकृत असे लिहिलेले आहे. त्यानंतर सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली. पण ती रिट याचिका 11 जुलै रोजी सक्षम प्राधिकरणाकडे याची दाद मागावी या निर्णयानंतर समाप्त झाली.
आता सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि.17 जुलै रोजी अर्ज सादर केला आहे. या अर्जात सर्व्हे क्रमांक 86 आणि 96 वर खासरा पत्रक 1954 मध्ये सुध्दा ही जागा सरकारची आहे अशी नोंद जोडली आहे. एका सर्व्हे नंबरचे वेगवेगळे भाग करून त्या वेगवेगळ्या व्यक्तीगत नावांवर अभिलेखात नोंद झाली आहे. पट्टेदार ही संकल्पना भारतासह दक्षिझ आशियामध्ये सुध्दा राबवली जाते. त्यात त्या जमीनीवर महसुल कर लावला जात नाही कारण ती जमीन वहितीकरण्यासाठी दिलेली असते. याचे पुरावे जोडले आहेत.
आपल्या सविस्तर अर्जात सरदार मनजितसिंघ यांनी या जमीनीचे वेळोवेळी बदलेले गट नंबर, सर्व्हे नंबर लिहुन या सर्व्हे नंबरमध्ये जोडण्यात आलेली व्यक्तीगत नावे रद्द करून ती जागा शासनाची आहे आणि या जागेचा पट्टेदार गुरूद्वारा बोर्ड आहे अशी नोंद घेण्यात यावी असे या अर्जात नमुद आहे.या अर्जात अधिक्षक भुमि अभिलेख, तहसीलदार नांदेड, उपअधिक्षक भुमी अभिलेख नांदेड, मंडळाधिकारी नांदेड आणि तलाठी नांदेड अशा पाच लोकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
भुमाफियांनी अत्यंत मोक्याची जागा हडप करण्याचा सुरू केलेला हा डाव आता कोणत्या मार्गाकडे जाईल हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर दिसेल. या भुमाफियांमध्ये कोण-कोण भागिदार आहेत यांची नावे आज तरी माहित झाली नाहीत.
बाफना टी पॉईंटच्या जागेचा पट्टेदार गुरूद्वारा बोर्ड आणि मालक सरकार असल्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल