नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळी अंतर्गत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी ठरवून दिलेले नियम पाळत महामानवाची जयंती साजरी करणाऱ्या मंगरुळ, माळेगाव आणि माळाकोळी अशा तिन गावांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रदान केले आणि त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
पोलीस ठाणे माळाकोळी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी आपले पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात शांतता समितीची बैठक घेतली होती. तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतांना त्या समितीने काही नियम, शर्ती ठरवून दिल्या होत्या. त्यावेळी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि कंधारचे पोलीस उपअधिक्षक मारोती थोरात यांची उपस्थिती होती. भिमजयंती मंडळांनी शांतता समितीत ठरलेल्या शर्ती व नियमानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आणि त्यामुळे एक वेगळा संदेश इतरांना मिळाला. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांना काटेकोरपणे पालन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक मौजे मंगरुळ येथील जयंती मंडळाने पटकावला. द्वितीय क्रमांक माळेगाव जयंती मंडळाने मिळवला. तर तृतीय क्रमांक माळाकोळी जयंती मंडळाने प्राप्त केला.
आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मंगरुळ, माळेगाव आणि माळाकोळी तिन भिम जयंती मंडळांना स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान केला. जयंती मंडळानी ध्वनी प्रदुषण होणार नाही अशी वाद्ये वाजवली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू दिला नाही. त्याबद्दल पोलीस अधिक्षकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले.
माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिम जयंती मंडळांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले स्मृतीचिन्ह