नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या प्रकरणाच्या वादातून एका युवकाचा दोन जणांनी काल दि.17 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास चौफाळा येथील पाण्याच्या टाकीजवळ खून केल्याचा प्रकार घडला आहे.
प्रतिभा किरण माने महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 17 जून रोजी पहाटे माझे पती किरण माने कामाला गेला. दुपारी 2 वाजता किरण मानेचा मला फोन आला.आमच्या कुत्रीला अविनाश नंदाने यांच्या घरी पाठवून देण्यास सांगितले. रात्री 8 वाजेच्यासुमारास मी अविनाश नंदानेला फोन लावून विचारले की, किरण कोठे आहे त्यांनी सांगितले आम्ही सोबत आहोत आणि चौफाळाच्या पाण्याच्या टाकीजवळ आहोत आणि थोड्यावेळात घरी येणार आहोत. 9 वाजेच्यासुमारास मी माझ्या पतीला फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही. नंतर अविनाश नंदानेला फोन लावला त्यांचा फोन बंद येवू लागला. त्यानंतर भिती वाटू लागली तेेंव्हा मी आणि माझा छोटा भाऊ मारोती किरणला शोधण्यासाठी चौफाळ्याच्या पाण्याच्या टाकीजवळ गेलो. त्यावेळी पाण्याच्या टाकीखालील पत्राच्या खोलीमधून शिवा माने आणि अविनाश नंदाने दोघे हाता खंजर घेवून गेटकडे पळतांना दिसले. मी पत्राच्या खोलीत जावून पाहिले असता माझा पती किरण माने रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटावर, छातीवर, मानेवर खंजरचे अनेक वार दिसत होते. ते बेशुध्द असल्याचे पाहुन मी त्यांना इतर नातलगांच्या मदतीने दवाखान्यात घेवून गेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवा माने यांच्या नात्यातील एका मुलीसोबत माझे पती किरण मानेचे प्रेम संबंध होते. त्यावरून अनेकदा भांडणे झाली. शिवा माने आणि अविनाश नंदाने बाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली होती.दोन वर्षापुर्वीच्या प्रेम संबंधाच्या कारणातून अविनाश नंदाने आणि शिवा माने यांनी माझे पती किरण भास्कर माने यांचा खून केला आहे. त्यांच्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी.
इतवारा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 222 /2023 दाखल केला आहे. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. दोन मारेकऱ्यांना शोधण्यासाठी रात्रभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. वृत्त लिहिपर्यंत मारेकऱ्यांचा सुगावा लागलेला नव्हता.