माहिती आयुक्तांचे गुरूद्वारा बोर्डाच्या माहिती अधिकारी व अपीलीय अधिकाऱ्यांविरुध्द कार्यवाहीचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)- गुरूद्वारा बोर्डाचे माहिती अधिकार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर माहिती आयोगाला 31 जुलैपर्यंत निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तो निकाल जाहीर झाला आहे. त्यात माहिती अधिकाऱ्याविरुध्द कार्यवाही का करण्यात येवू नये याचा खुलासा मागवला आहे. तसेच या प्रकरणातील प्रथम अपीली अधिकाऱ्याविरुध्द गुरुद्वारा बोर्ड प्रशासकांनी शिस्तभंगाची कार्यवाही करावी असे आदेश राज्य माहिती आयुक्तालय खंडपीठ औरंगाबाद येथील आयुक्त समीर सहाय यांनी निर्गमित केले आहेत.
ऍड.अमृतपालसिंघ खालसा रा.उल्हासनगर ठाणे यांनी माहितीच्या अधिकारात ऑक्टोबर 2022 मध्ये गुरूद्वारा बोर्ड जनमाहिती अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली होती. त्यावेळी जवळपास 36 लाखांचा अपहार झाला होता. पण तत्कालीन गुरूद्वारा बोर्डाचे माहिती अधिकारी हरजितसिंघ बलवंतसिंघ कडेवाले हे होते. तसेच प्रथम अपीलीय अधिकारी थानसिंघ जीवनसिंघ बुंगई हे होते. ऍड.अमृतपालसिंघ खालसा यांना दोन्ही जागी माहिती देण्यात टाळाटाळ झाली.म्हणून त्यांनी माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे दुसरे अपील सादर केले.
माहिती आयुक्त 22 मे 2023 रोजी सुनावणी झाली असतांना निकाल देत नाही म्हणून ऍड.अमृतपालसिंघ यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने माहिती आयोगाला 31 जुलै पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार हा निकाल जाहीर झाला आहे आणि ऍड.अमृतपासिंघ यांनी मागितलेली माहिती हा आदेश मिळाल्यानंतर 30 दिवसात नोंदणीकृत टपालाद्वारे विनामुल्य पुरविण्यात यावी. तसेच तत्कालीन माहिती अधिकारी हरजितसिंघ कडेवाले सहाय्यक अधिक्षक गुरूद्वारा बोर्ड कार्यालय यांनी विहित मुदतीत कार्यवाही न केल्यामुळे अनियमितता कलम 7 (1) चा भंग झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कलम 19(8) (ग) आणि कलम 20(1) यामध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे कार्यवाही का करण्यात येवू नये याचा खुलासा 30 दिवसांत सादर करावा असे आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहे.
तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी तथा गुरूद्वारा बोर्ड अधिक्षक यांनी या प्रकरणात अपीलाची सुनावणी न घेवून कलम 19(6) चा भंग केलेला आहे. त्यामुळे गुरूद्वारा प्रशासक मुंबई यांनी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दि.31 मार्च 2008 नुसार तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी थानसिंघ जीवनसिंघ बुंगई यांच्याविरुध्द कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/07/14/माहिती-आयुक्त-आदेश-करत-ना/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *