नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत गुप्त नाव ठेवून पोलीस निरिक्षकाने दाखल केलेल्या मकोका गुन्ह्यातील रिंदा या टोळी प्रमुखाच्या पाच सदस्यांना आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. विमानतळ पोलीस ठाण्यातील एका मकोका गुन्ह्यात एका आरोपीला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 25 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या तक्रारीच्या गुन्ह्यात काही साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष नोंदविण्यात आले आहेत.
पोलीस निरिक्षकाचे नाव गुप्त ठेवून वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 129/2023 मध्ये मकोका कायद्याची जोड झाली. या प्रकरणात तपासीक अंमलदारांनी सर्व प्रथम भरतकुमार धरमदास पोपटानी उर्फ मॅक्सी यास अटक झाली. त्यानंतर पंजाब येथून मनप्रितसिंघ उर्फ सोनु सुरजनसिंघ औलख यास पकडण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी अगोदरच दुसऱ्या मकोका कायद्यात जेलमध्ये असलेल्या इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर, मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे आणि जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू अशा पाच जणांना मकोका कायद्यात अटक झाली. सुरूवातीला न्यायालयाने मॅक्सीला 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यानंतर पकडलेल्या चार जणांना सुध्दा 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. आज 19 जुलै रोजी या पाच जणांना न्यायालयात हजर करून तपासीक अंमलदारानेच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्या विनंतीला मंजुर करण्यात आले. या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब पोलीसांनी न्यायालयासमक्ष फौजदारी प्रक्रिया संहिता 164 प्रमाणे नोंदवल्याची माहिती आहे. सर्व साक्षीदारांची नावे सध्या ट्रॅंकेट (गुप्त) ठेवण्यात आली आहेत.
विमानतळ प्रकरणात एकाला 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 मार्च 2023 रोजी काही जणांनी काही जणांनी रमेश राजाराम हिवराळे याच्यावर हल्ला केला. या हल्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा सहभागी होता. त्यात काही जणांना अटक झाली होती. या गुन्हा क्रमांक 80/2023 चा तपास नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्याकडे आहे.
आज अंकुश उर्फ प्रद्युम्न हरीहरराव हंबर्डे (24) रा.विष्णुपूरी यास अटक करून आणले. न्यायालयाने सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी मांडलेला युक्तीवाद लक्षात घेवून अंकुश उर्फ प्रद्युम्न हंबर्डेला 25 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रिंदा गॅंगच्या पाच सदस्यांना न्यायालयीन कोठडी; प्रभाकर हंबर्डे गॅंगच्या एकाला मकोका कायद्यात पोलीस कोठडीत