नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 8 वाजेच्यासुमारास तहसील कार्यालयासमोर असलेल्या पंचप्यारे साहिबान यांच्या निवासस्थानाच्या गेटसमोर गाडी काढण्यासाठी सांगितल्यावरुन काही पोलीसांनी हरजितसिंघ बलवंतसिंघ कडेवाले यांना मारहाण केली आहे. हरजितसिंघ कडेवाले हे गुरूद्वारा बोर्डात सहाय्यक अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. तसेच हरजितसिंघ हे श्री.हजुर साहिब येथे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे मोठे बंधू आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात धक्काबुक्की झाल्याची नोंद स्टेशन डायरी क्रमांक 44 वर वजिराबाद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. ही नोंद 19.59 वाजताची आहे. वजिराबादचे तातपुर्ते पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड असतांना सीसीटीएनएसमध्ये आजही पोलीस निरिक्षक जगदीश राजन्ना भंडरवार यांचेच नाव आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार नांदेड तहसील कार्यालयासमोर श्री.पंचप्यारे साहिबान यांचे निवासस्थान आहे. यातील निवासस्थानक क्रमांक 2 हे जत्थेदार संतबाबा श्री.कुलवंतसिंघजी यांचे आहे. या निवासस्थानात त्यांचे मोठे बंधू हरजितसिंघ बलवंतसिंघ कडेवाले वास्तव्यास आहेत. काल सायंकाळी 7 ते 7.15 या वेळेदरम्यान ते गुरूद्वारा बोर्ड कार्यालयातून परत घरी आले तेंव्हा त्यांच्या घरासमोर गेटमध्ये जाता येणार नाही अशा परिस्थितीत चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.19 सी.व्ही.0850 उभी होती. या गाडीमध्ये दोन व्यक्ती बसलेले होते. हरजितसिंघ यांनी ती गाडी गेटसमोरून काढण्यास सांगितली असता गाडीतील लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांना मागच्या बाजूने जा असे सांगितले. तेंव्हा काय बोलणे झाले माहित नाही पण गाडीतील दोन्ही व्यक्ती खाली उतरले आणि त्यांनी हरजितसिंघ यांना मारहाण केली. त्यात हरजितसिंघ यांच्या तोंडातून रक्त वाहु लागले. त्यांचे ओठ सुजले आहेत. तसेच त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि दवाखान्यातील लोकांनी सांगितले की, त्यांच्या छातीवर सुध्दा सुज आलेली आहे.
त्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार मारहाण करणारी मंडळी पोलीस आहेत. ते शेजारी असलेल्या एका बारमधून बाहेर आले होते असे त्या ठिकाणचे लोक सांगत आहेत. बारमध्ये आणि संतजींच्या निवासासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. या संदर्भाने पोलीस ठाणे वजिराबाद रात्री 19.59 वाजता नोंद क्रमांक 44 प्रमाणे नोंद केलेली आहे की, जखमी नामे हरजितसिंघ कडेवाले यांना धक्काबुक्कीमध्ये कपाळावर ओठावर मार लागल्याने त्यांना शासकीय दवाखाना वजिराबाद येथे पाठविले. येताच तक्रार घेण्याची तजबिज ठेवली आहे करीता नोंद. या नोंदीमध्ये पोलीस निरिक्षक या सदरामध्ये आजही जगदीश राजन्ना भंडरवार यांचे नाव येत आहे. पण प्रत्यक्षात तातपुर्ते स्वरुपात वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक पदावर अशोक घोरबांड यांची नियुक्ती आहे. अत्यंत कमी बोलणारे व्यक्तीमत्व अशी गुरूद्वारा बोर्डाचे सहाय्यक अधिक्षक हरजितसिंघ कडेवाले यांची ख्याती आहे. त्यांना झालेल्या मारहाणीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
