
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 18 व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड जिल्ह्याने 11 सुवर्ण आणि 3 रजत पदक अशी मोठी कमाई करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्याने चार सुवर्ण आणि चार रजत पदक प्राप्त केले आहेत. परभणी जिल्ह्याने चार सुवर्ण आणि आठ रजत पदक प्राप्त केले आहेत. हिंगोली जिल्ह्याने एक सुवर्ण आणि चार रजत पदक प्राप्त केले आहेत.
17 ते 19 जुलै दरम्यान पार पडलेल्या नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावा 2023 मध्ये मुख्य सहा स्पर्धा आणि 14 उपस्पर्धा अशा एकूण 20 स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात 60 स्पर्धकांनी भाग घेतला.त्यात नांदेड जिल्ह्याने जनरल चॅम्पीयनशिप पटकावली. दुसरा क्रमांक परभणी जिल्ह्याला मिळाला. या स्पर्धेतील सुवर्ण पदक व रजत पदक विजेत्यांच्या टिममधून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील संघ निवडला जाणार आहे.
या प्रसंगी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी विजेत्यांना उद्देशून बोलतांना सांगितले की, आजचा तुमचा विजय पुढच्या स्पर्धेसाठी आव्हानात्मक असणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुध्दा चमकदार कामगिरी केली तर आज तुम्ही मिळवलेला विजय तुमच्या खऱ्या मेहनतीचा आहे असे दिसेल. त्यासाठी डॉ.महावरकर यांनी सर्वांना शुभकामना दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक संचालक प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा श्रीमती सुनदेवणीकर यांची उपस्थिती होती. सर्व विजेत्यांना त्यांच्या-त्यांच्या स्पर्धेत जिंकल्याप्रमाणे सुवर्ण आणि रजत पदक देण्यात आले. या स्पर्धांमध्ये सहाय्यक संचालक एस.सी.बोदरे, डॉ.हेमंत गोडबोले, डॉ.मारोती डोके, पोलीस निरिक्षक संतोष रमेश वाघ, सहाय्यक पोलीस निरिक्षक पी.यु.माळवदकर यांनी पंचांची भुमिका पार पाडली.

या मेळाव्याचे आयोजन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन, शफकत आमना, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, डॉ.अश्र्विनी जगताप, एम.डी.थोरात, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, विजय धोंडगे, नामदेव रिठ्ठे, शामसुंदर टाक, उदय खंडेराय,कार्यालय प्रबंधक अनिरुध्द कवठाळे, कार्यालय अधिक्षक किरण देशपांडे आदी 14 जणांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीने हे कामकाज केले.
कर्तव्य मेळाव्यातील मुख्य सहा स्पर्धा आणि 14 उपस्पर्धांमधील सुवर्ण पदक व रजत पदक विजेते पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची जेपीजी फोटो कॉपी बातमीत जोडली आहे.
